शिवसेनेचा किल्ला ढासळला..! माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, कुणाल किसन तापकीर राष्ट्रवादीत, प्रभाग ३ मध्ये राजकीय भूकंप

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसला आहे. शिवसेनेचे खंदे शिलेदार व माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी शिवसेनेला रामराम ठोकत थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. सोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपशहर प्रमुख राहुल बाळासाहेब गवळी आणि चऱ्होली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भोसरी उपशहर प्रमुख ऍड कुणाल किसन महाराज तापकीर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रवेश केला.
चिखली येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेत हा पक्षप्रवेश झाला आणि एकाच क्षणात प्रभाग क्रमांक ३ चे राजकीय गणित पूर्णपणे उलथापालथ झाले. अजित पवार यांनी नव्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत “काम करणाऱ्यांना राष्ट्रवादीत कधीच कमी लेखले जात नाही,” असा थेट राजकीय संदेश दिला.
हेही वाचा : महापालिका शाळेत आधुनिक सोयी-सुविधांची जोड अन् आदर्श शाळा पुरस्कार!
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच प्रभागातून राष्ट्रवादीच्या विनया तापकीर व प्रदीप तापकीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपने प्रभागावर दावा सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राष्ट्रवादीने केलेल्या या मास्टरस्ट्रोकमुळे भाजपचा आनंद क्षणातच फिका पडला असून, आता प्रभाग ३ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, चऱ्होली भागातील शिवसेना (उबाठा) गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे. सलग होणारे पक्षप्रवेश, नेतृत्वाची ओहोटी आणि कार्यकर्त्यांची गळती यामुळे शिवसेनेचा या भागातील किल्ला अक्षरशः कोसळताना दिसत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रभाग ३ मध्ये निर्णायक ताकद म्हणून उभी राहत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीआधीच झालेला हा राजकीय भूकंप प्रभाग ३ मध्ये सत्तासंघर्ष अधिक आक्रमक, अधिक तीव्र आणि अधिक निर्णायक करणार, हे मात्र निश्चित!




