वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज

पिंपरी : शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत योग्य काळजी घेतल्यास उष्माघातासारख्या गंभीर आजारापासून बचाव करता येऊ शकतो.
उष्माघात ही एक गंभीर आरोग्य समस्या असून शरीराचे तापमान अत्यंत वाढल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, डोकेदुखी, गोंधळ होणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी विलंब न करता त्वरित सावलीत जाऊन प्राथमिक उपचार घ्यावेत व जवळच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन उष्माघातापासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड DP अंमलबजावणीसाठी नियोजन समिती
उष्माघाताची लक्षणे ओळखा
– अंगात प्रचंड उष्णता जाणवणे
– चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे
– मळमळ, उलट्या होणे
– तीव्र डोकेदुखी
– त्वचा कोरडी व गरम होणे
– गोंधळ, अस्वस्थता किंवा बेशुद्धावस्था
उष्माघात टाळण्यासाठी ही काळजी घ्यावी
– दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे
– भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ सेवन करावे
– डोक्यावर टोपी, छत्री किंवा कापड वापरावे
– सैल व हलक्या रंगाचे सूती कपडे परिधान करावेत
– उपाशीपोटी बाहेर पडू नये
– थकवा जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी
– लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संभाव्य उष्माघाताच्या घटनांचा विचार करून महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित महापालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
उष्माघात ही टाळता येण्याजोगी पण गंभीर समस्या आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची कमतरता आणि अतिउष्णतेमुळे चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवताच विलंब न करता सावलीत विश्रांती घ्यावी आणि त्वरित जवळच्या महापालिका रुग्णालयात उष्माघातावर प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका





