पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार अमोल कोल्हे यांचा वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ : एक राजकीय स्वार्थाचा अन् दुसरा निस्वार्थ मैत्रीचा!
राजकारणात ‘कुछ भी हो सकता है’ चा प्रत्यय : राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमधून व्यक्त होतेय खंत
पुणे । राज्यातील सेलिब्रेटी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा वाढदिवस (दि.१७) साजरा झाला. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका ‘‘स्वराज्यरक्षक संभाजी’’ मालिकेतून अजरामर करणारे प्रगल्भ अभिनेता, अमोघ वत्कृत्वाचे धनी आणि उच्चशिक्षीत खासदार म्हणून डॉ. कोल्हे यांची ओळख महाराष्ट्रासह देशभरात आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे खासदार डॉ. कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्येही ‘अभिनंदनाचे बॅनर’ झळकले. त्यानिमित्ताने दोन मतप्रवाह निर्माण झाले. डॉ. कोल्हे यांचा वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ ‘‘ एक राजकीय स्वार्थाचा अन् दुसरा निस्वार्थ मैत्रीचा..’’ अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे.
महानगरपालिकेचे गटनेते राहुल कलाटे आणि डॉ. कोल्हे यांची मैत्री सर्वश्रृत आहे. डॉ. कोल्हे खासदार नव्हते, त्यापासून २०१९ मध्ये लढलेली निवडणूक, २०२४ मध्ये लढलेली निवडणूक यामध्ये राजकीय चढउतारामध्ये कायम सोबत राहिलेले राहुल कलाटे यांनीही डॉ. कोल्हे यांचा वाढदिवस साजरा केला. पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या काळात कोल्हे यांना ‘कनेक्ट’ नव्हता. त्यावेळी कलाटे यांनी त्यांना साथ आणि सर्वोतोपरी मदत केल्याचे राजकीय जाणकार सांगतात. डॉ. कोल्हे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे कलाटे आणि त्यांचे जीवलग मित्र नवनाथ जगताप यांनी डॉ. कोल्हे यांची भेट घेतली. शुभेच्छाही दिल्या आणि गळाभेटही झाली. राजकीय क्षेत्रात दोन मित्रांमधील झालेला संवाद राहुल कलाटे यांनी ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केला आहे. त्याद्वारे कलाटेंच्या निस्वार्थ मैत्रीची झलक पहायला मिळते.
दुसरीकडे, डॉ. कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील तीव्र इच्छुक अजित गव्हाणे यांनी जोरदार फ्लेक्सबाजी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. वास्तविक, राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमध्ये गव्हाणे यांचा प्रवेशाबाबत नाराजी आहे. ‘‘आयात उमेदवार नको’’ असा एक मतप्रवाह आहे. त्यात गव्हाणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेले डॉ. कोल्हे यांचे वाढदिवसाचे ‘ब्रँडींग’ केले.
राष्ट्रवादी एकसंघ असताना महाविकास आघाडीच्या सत्ता काळात आणि २०२२ मध्ये महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागली होती. त्यावेळी गव्हाणे आणि समर्थकांनी डॉ. कोल्हे यांच्या ‘टिआरपी’चा वापर करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. किंबहुना, खासदार निधीतून केलेल्या विविध कामांचे ‘ब्रँडिंग’ही केले. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीत दोन गट पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीला साथ दिली आणि सत्तेत प्रवेश केला. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण, गव्हाणे यांनी अजित पवारांसोबत सत्तेसोबत जाण्याला पसंती दिली.
दरम्यान, महायुतीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असताना अजित गव्हाणे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यापासून दुरावा ठेवला. कारण, पक्ष वेगवेगळे होते. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे शिरुरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. गव्हाणे यांचे ‘पॉलिटिकल गॉडफादर’ म्हणून लांडे यांची ओळख आहे. लांडे यांना लोकसभा उमेदवारी मिळावी. यासाठी गव्हाणे आणि टीमने पूर्णत: प्रयत्न केले होते. पण, राजकारणात ‘‘कुछ भी हो सकता है’’ त्यामुळे आता पुन्हा गव्हाणे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची ‘बीज पेरणी’ सुरू केली आहे. डॉ. कोल्हे यांच्यासोबत नव्याने केलेली राजकीय मैत्री गव्हाणे यांना फायद्याची ठरते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






