हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा उघड
जेसीबीसाठी मांडवली ; आणखी एक रिकव्हरी एजंट गजाआड

पिंपरी चिंचवड : बँकेने जेसीबी मशिन जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यानंतरही शशांक हगवणे याच्यासोबत मांडवली करून रिकव्हरी एजंटला ३० हजार रूपये देणार्या मध्यस्थालाही महाळूंगे एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी (दि. ६) अटक केली. दरम्यान, हगवणे माय-लेकाची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना तसेच अटक केलेल्या मध्यस्थाला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे जेसीबी फसवणूक प्रकरणात वैष्णवी मृत्यु प्रकरणातील आरोपी हगवणे माय-लेकांसह आता सहा आरोपींचा समावेश झाला आहे. प्रणय तुकाराम साठे (वय २७, रा. कोथरूड) असे अटक केलेल्या मध्यस्थीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी योगेश राजेंद्र रासकर (वय २५, रा. तळेगाव ढमढेरे), गणेश रमेश पोतले (वय ३०, रा. मोहितेवाडी) आणि वैभव मोहन पिंगळे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे) या तिघा रिकव्हरी एंजटलाही अटक झाली आहे. प्रशांत अविनाश येळवंडे (वय ३३, रा. निघोजे, ता. खेड) यांनी २९ मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणातील आरोपी शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) या माय-लेका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाळूंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून मंगळवारी (दि. ३) या माय-लेकाला ताब्यात घेतले. राजगुरूनगर न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हेही वाचा – गुन्हेगारांवर मोठी कारवाई!
आरोपी रासकर, पोतले आणि पिंंगळे या तिघांनी बेकायदेशीरपणे फिर्यादी येळवंडे यांच्या चालकाकडून जेसीबी मशिन घेऊन ते आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, या तिघांनाही पोलीसांनी गुरूवारी अटक केली होती. तिघे ७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, चौकशीत तिघा आरोपींनी शशांकचा मित्र साठे या रिकव्हरी एजंटने मध्यस्थी केल्याचे सांगितले. शशांकचा चालक देवानंद कोळी याच्या मार्फत गुगल पे द्वारे ३० हजार रूपये साठे याला दिले असून साठे याने ती रक्कम आरोपी पोतले याला गुगल पे द्वारे दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, साठे याला शुक्रवारी अटक करण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारी हगवणे माय-लेकाची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना तसेच आज अटक केलेल्या मध्यस्थी साठे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शनिवारी (दि. ७) या सर्व सहा आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली.