नैसर्गिक आपत्तीमध्ये आयटी कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ द्या!
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे/पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः हिंजवडी आयटी हबकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने अधिकृतरीत्या ‘वर्क फ्रॉम होम’ (Work from Home) लागू करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन (PCCHSF)चे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात सचिन लोंढे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदन सादर करून आपत्कालीन परिस्थितीत आयटी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या मते, अतिवृष्टी, पूरस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठ्या संख्येने आयटी कर्मचारी कार्यालयाकडे निघाल्याने आधीच विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येण्याबरोबरच आपत्कालीन सेवांच्या कामातही अडथळे निर्माण होतात.
हिंजवडी, तळवडे आणि इतर आयटी पार्ककडे जाणारे रस्ते पावसाळ्यात अनेकदा पाण्याखाली जात असल्याने हजारो कर्मचाऱ्यांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. याचा परिणाम त्यांच्या सुरक्षिततेवर, आरोग्यावर आणि उत्पादकतेवरही होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
लोंढे यांनी प्रशासनाला सुचविले आहे की, हवामान खात्याचा रेड अलर्ट, अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्ती जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आयटी कंपन्यांना तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याबाबत अधिकृत सूचना द्याव्यात. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल, वाहतूक सुरळीत ठेवणे सोपे जाईल आणि अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस तसेच इतर आपत्कालीन यंत्रणांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये पूरबाधित भागातील १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. हिंजवडी आयटी हबला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला असून, अनेक कर्मचारी तासन्तास कोंडीत अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असताना, मोठ्या प्रमाणावर कार्यालयीन वाहतूक सुरू असल्याने नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहरातील नोकरदार वर्ग, गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत सचिन लोंढे यांनी प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी फेडरेशन या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांची होणारी फरफट आणि वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी प्रशासनाने ‘वर्क फ्रॉम होम’चे धोरण तातडीने लागू करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी फेडरेशन या मागणीचा प्रशासनाकडे शेवटपर्यंत पाठपुरावा करेल.”
— सचिन लोंढे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन (PCCHSF)





