भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर ; २० तारखेला नाव येणार समोर

BJP President : बहुप्रतीक्षित भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखा आता पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीत पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. 19 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. तर 20 जानेवारी रोजी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन हेच या पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात आहेत. त्यांच्या विरोधात दुसरा उमेदवार उभा राहण्याची शक्यता कमी असल्याने त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
हेही वाचा – मुंबईच्या प्राथमिक कलांमध्ये भाजपचे शतक ; ठाकरेंना धक्का, मुंबईत पहिल्यांदाच होणार भाजपाचा महापौर?
समोर आलेल्या माहितीनुसार, नामांकन प्रक्रियेदरम्यान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह तसेच विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे प्रस्तावक म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेचे सदस्य यांना दिल्ली येथे पाचारण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया केवळ औपचारिक नसून, पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
46 वर्षीय नितीन नबीन यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास ते भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरतील. जे.पी. नड्डा यांच्या दीर्घ कार्यकाळानंतर होणारा हा बदल पक्षात नव्या नेतृत्वाचा आणि रणनीतीतील बदलाचा संकेत मानला जात आहे. डिसेंबर 2025 मध्ये कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नितीन नबीन यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. विशेषतः बूथ पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी ही त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.




