मावळमध्ये घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू; अतिवृष्टीचा जिल्हाभर कहर, पाच जणांचा बळी
जिल्हा प्रशासन सतर्क : शहर आणि ग्रामीण भागात सतर्कतेचा इशारा

पुणे | पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण स्वरूप धारण केले असून, मावळ तालुक्यातील पाटण गावात पहाटे घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांची पत्नी अनिता तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर (माऊली) तिकोणे यांचा मृत्यू झाला. तर घरातील सून घरापासून दूर असल्याने ती या दुर्घटनेतून थोडक्यात बचावली.
संततधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून माती, दगड आणि झाडांचा मोठा ढिगारा थेट तिकोणे यांच्या घरावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एनडीआरएफच्या पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य राबविले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक दरडप्रवण भाग धोक्याच्या छायेत आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील दरडप्रवण वस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा
मतदार यादी अद्ययावतीकरण (SIR) मोहिमेत १०० टक्के सहभाग नोंदवा!
जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; पाच जणांचा मृत्यू
दरम्यान, अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २० जण जखमी झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर खेड तालुक्यात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
चाकणमध्ये महामार्ग जलमय; वाहतूक ठप्प
उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः चाकण परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे पुणे–नाशिक महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे. महामार्गावरून वेगाने पाणी वाहत असल्याने गेल्या ८ ते १० तासांपासून वाहतूक ठप्प झाली असून, शेकडो प्रवासी आणि वाहनचालक अडकून पडले आहेत. अनेकांना अन्न-पाण्याविना ताटकळत राहावे लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
पुण्यात १४७ झाडे कोसळली
१ जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे शहरात तब्बल १४७ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, झाडांच्या फांद्या छाटण्याच्या कामाला काही पर्यावरणप्रेमी संस्थांकडून विरोध होत असल्याने आवश्यक छाटणी करता येत नसल्याचा दावा पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केला आहे. त्यामुळे मुसळधार पावसात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या दाव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





