Ajitdada's memorial should be built in MIDC area: Sandeep Belsare
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या एमआयडीसी मधील लघुउद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम सकारात्मक भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेत असत. येथील विज, पाणी, रस्ते, वाहतूक समस्या, मिळकत कर, संघटनेला जागा देणे, लघु उद्योजकांचे पुनर्वसन करणे अशा अनेक प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कायम तत्परता दाखवून सकारात्मक भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्नांची सोडवणूक केली, अशा भावना उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या स्मृती लघु उद्योजकांनी कायम जतन कराव्यात आणि पुढील पिढीस मार्गदर्शक ठराव्यात यासाठी पिंपरी चिंचवड एमआयडीसी परिसरात स्व. अजित दादा पवार यांचे स्मारक उभारावे यासाठी आपण पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याच्यासोबत विमानात असणाऱ्या इतर ४ व्यक्तींचा २८ फेब्रुवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने सोमवारी मोशी प्राधिकरण सेक्टर ४, येथील पर्ल बँक्वेट हॉल येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, संजय भोसले, माणिक पडवळ, बशीरभाई तरसगार आदी लघु उद्योजक उपस्थित होते.
यावेळी सुरेश म्हेत्रे म्हणाले की, लघु उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. पिंपरी चिंचवड मधील लघु उद्योजकांच्या दृष्टीने अजितदादा पवार हे लोहपुरुष होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी येथे एखादा प्रकल्प सुरू करावा.
उद्योजकांना अजितदादांचे पाठबळ..
संजय आहेर यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना बरोबरच राज्यातील सर्वच लघुउद्योजकांना अजितदादा पवार नेहमी पाठबळ देत होते. पिंपरी चिंचवड एमआयडीसी ला अजित नगर असे नाव देण्यात यावे यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करावेत. हर्षल थोरवे म्हणाले की, सर्व लहान थोरांच्या मनात घर केलेला आपला माणूस गमावल्याची भावना आहे. इतरही लघु उद्योजकांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. दोन मिनिटे शांत उभे राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व पसायदान म्हणून श्रद्धांजली सभा विसर्जित करण्यात आली.