अबब! लाचखोर फौजदाराच्या घरात घबाड सापडले!
अटक फौजदाराच्या घरातून ५१ लाखाची रोकड जप्त

तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
पिंपरी चिंचवड : : पिंपरी – िंचचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या फौजदाराला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्यानंतर मध्यरात्री त्याच्या दिघी येथील घरावर छापा टाकला असता पोलीसांना तब्बल ५१ लाख रूपयांची रोकड मिळून आली. याशिवाय दागदागिने, इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली. दरम्यान, लाचखोर फौजदाराला सोमवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
प्रमोद रविंद्र चिंतामणी (वय ४४, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, मूळ – कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे लाचखोर फौजदाराचे नाव आहे. याबाबत एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी माहिती दिली. तक्रारदार वकील असून त्यांच्या अशिलाविरोधात बावधनमध्ये गुन्हा दाखल आहे. अशिलाचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतील फौजदार प्रमोद चिंतामणी याच्याकडे होता. अशिलाला मदत करण्यासाठी तसेच, जामीन अर्जावर पोलीस उत्तर (से) दाखल करण्यासाठी प्रमोद चिंतामणीने २ लाखांची लाच मागितली होती. मात्र, या प्रकरणात मोठे व्यवहार समजल्यानंतर चिंतामणीने २ कोटी देण्याचा तगादा लावला. १ कोटी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला तर १ कोटी स्वत:साठी मागितल्याचे समोर आले. तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीने चिंतामणीला पुण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी ४६ लाख ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
हेही वाचा – कुदळवाडी चिखली परिसरातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर
कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने चिंतामणी याच्या भोसरीतील दिघी रोड येथील गंगोत्री पार्कमधील सोपान रेसिडेन्सी येथील घरावर छापा घातला. या छाप्यात पोलिसांना मोठे घबाड आढळून आले. तब्बल ५१ लाख रुपयांची रोकड, दागदागिने, इतर महत्वाची कागदपत्रे आढळून आली. रात्री उशिरापर्यंत ही म्ाोजदाद सुरु होती. प्रमोद चिंतामणी याने लाचेची मागणी करताना १ कोटी त्याच्यासाठी व १ कोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी मागणी केली होती. त्यामुळे त्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती दयानंद गावडे यांनी दिली.




