दिवाळीनंतरच उडणार प्रचाराचा धुरळा, अपक्ष निवडणूक चिन्हाच्या प्रतिक्षेत….

पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून सर्वच महायुती व महाविकास आघाडीसह महत्त्वाच्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. तर पाच तारखेला अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने हे उमेदवारदेखील आपल्या समर्थकांसह प्रचारात उतरणार आहेत. तर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभादेखील दिवाळीनंतरच आयोजित केल्या जाणार असल्याने खर्या अर्थाने दिवाळीनंतरच उडणार प्रचाराचा धुरळा उडणार अाहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तीन मतदार संघांपैकीतीनही मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे यंदाही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र असले तरी दिवाळीनंतरच खर्या अर्थाने प्रचाराला जोर येणार आहे. अद्याप अपक्षांना चिन्हच मिळाले नसल्याने त्यांनी केवळ व्यक्तीगत भेटी-गाठींवर भर दिला आहे. दुसरीरकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांसह उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले आहे. दिवाळीत उमेदवार व कार्यकर्त्यांचा घरोघरी भेटी देण्यावर भर राहणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात १४ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या 16 दिवसांत सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून पायदळ, मोटर सायकल, रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने नियोजन केलेले आहे. विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते आणि मंत्र्यांच्या सभाही होणार आहेत. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, प्रचार सुरु होणार आहेत. एक प्रचाराचे फड रंगणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील आघाडी कमी झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी महायुतीचे बडे नेते मैदानात उतरणार आहेत. त्याची आखणी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने केली असून मतदारांना साद घालणार आहे. शहरातील सहाही मतदार संघात विजय मिळावा असा भाजपचा तर तसाच प्रयत्न महाविकास आघाडीचाही आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही कडून बहुमताच्याही पार जाण्याचे दावे केले जात आहेत. परंतु महायुती आणि महाविकास आघाडीला यंदा बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे बंडखोरांची भूमिका महायुती आणि आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी अडथळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.





