मावळला पाच वर्षात ४ हजार १५८ कोटींचा निधी, आमदार सुनील शेळके यांची माहिती

वडगाव मावळ : मावळ मतदारसंघात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेल्यानंतर त्यांनी तालुक्यासाठी तब्बल १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला.त्यामुळे गेल्या ५ वर्षात मावळला मिळालेला निधी ४ हजार १५८ कोटी ३२ लक्ष रुपये इतका झाला आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, देवा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यातील माय-बाप जनतेने मला पाच वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या कालावधीत केलेल्या कामांचा लेखाजोखा लवकरच अहवाल स्वरुपात मावळच्या जनतेपुढे मांडणार आहे.
हेही वाचा – महाविकास आघाडीचं जागा वाटपावर घोडं अडलं, चंद्रकांतदादा उमेदवारी अर्ज दाखल करणार!
मावळातील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी अजितदादा काही दिवसांपूर्वी मावळात येऊन गेले. त्यानंतरही त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मावळच्या विकासासाठी दिला.आचारसंहिता संपल्यानंतर राहिलेल्या कामांसाठी देखील आपण निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले.
सुनील शेळके यांनी यावेळी मिळालेला एकूण निधी कोणकोणत्या कामासाठी अथवा विभागासाठी उपलब्ध झाला याची थोडक्यात माहिती दिली.तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, डीपीडीसी, आदिवासी विभाग, प्रशासकीय इमारती, आरोग्य विषयक सुविधा, रेल्वे उड्डाणपूल आदी विकासकामे तसेच लोकोपयोगी उपक्रमांना दिलेल्या निधीची माहिती शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मावळ तालुक्यातील महायुतीचा उमेदवार दोन दिवसात जाहीर होईल. महायुतीचे नेते देतील त्या उमेदवाराला आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आणू, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असले तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वजण एकजुटीने महायुती धर्माचे पालन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सोबत भाजपाचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही हीच भूमिका जाहीरपणे मांडल्याबद्दल शेळके यांनी त्यांच्या भुमिकेचे स्वागत केले.





