रिंगरोडच्या भूसंपादनासाठी पीएमआरडीएकडून १३ प्रस्ताव

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने उभारण्यात येत असलेल्या रिंग रस्त्यासाठी भूसंपादनाचे १३ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. आता यापुढील कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होईल. खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना २५ टक्के अतिरिक्त मोबदला मिळणार आहे. अशी माहिती पीएमआरडीएचे सहआयुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.
पीएमआरडीएचा रिंगरोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सोळू येथुन सुरु होणारा हा रिंगरस्ता एकूण १२८ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील परंदवाडी ते सोळू या ४० किलोमीटर अंतरातील रिंग रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. वाघोली ते लोहगाव या अंतरातील ५.७० किलोमीटर रस्त्याचे काम पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
हेही वाचा – एसटी बस प्रवासातही “यूपीआय’ सुपरहिट
तर, पीएमआरडीएकडून एकूण ८३.१२ किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम केले जाणार आहे. हा रस्ता सुरुवातीला पीएमआरडीए हद्दीत ११० मीटर रुंद करण्यात येणार होता. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे हा रस्ता सध्या ६५ मीटर इतका रुंद करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएने सोळू ते वडगाव शिंदे या ४.७० किलोमीटर अंतरातील रस्त्याचा भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेला आहे. सध्या हे काम मोजणी स्तरावर आहे. जिल्हा प्रशासनाने हे प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाला पाठविले असल्याची माहिती आहे. त्यानुसार पुढील महिनाभरात संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिंगरोडला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.