रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
पिंपरी – नियमांचे पालन न करणे, निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे बहुतांश अपघात होतात. अपघाताच्या घटनांमध्ये काहीजण व्यक्तिगत कारणांमुळे इतरांना इजा पोहोचवतात. अपघात कमी करण्यासाठी राबविण्यात येणारे रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 32 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत चांगले आणि दर्जेदार वाहन चालक तयार करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड, न्यु पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग रिसर्च सेंटर (आयडीटीआर) कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे उदघाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अतुल आदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, आयडीटीआरचे प्राचार्य राजीव घाटोळे, एनपीसीएमडीएसएचे अध्यक्ष स्वप्नील पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, मनोज ओतारी, संघटनेचे पदाधिकारी नानासाहेब शिंदे, अरुण शहा, नंदकुमार चव्हाण, बबनराव मिसाळ, विजयसिंह परदेशी, मनीष चव्हाण, मुसा शेख, संतोष आयोळकर, सतीश काळे, तुषार दळवी, पैगंबर सय्यद, स्वप्नील चव्हाण, अमित शहा, कन्हैया पुजारी आदी उपस्थित होते.
वाहन चालक प्रशिक्षण संस्थांनी सुद्धा स्टेअरिंग, क्लच, ब्रेक, गिअर एवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता त्यासोबत सुरक्षित वाहन चालविण्यावर जास्त भर द्यायला हवा. रस्त्यावर अपघात झाल्यास काहीजण केवळ बघ्याची भूमिका घेतात. अनेकजण फोटो काढत बसतात. तर असे न करता नागरिकांनी अपघातग्रस्त व्यक्तींना गोल्डन हावरमध्ये उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करायला हवं. रस्त्यावरील वावर प्रत्येकाने सुरक्षित करायला हवा, असेही आदे म्हणाले.राजीव घाटोळे म्हणाले, “दरवर्षी हे अभियान एक आठवडा चालवलं जायचं. पण यावर्षी एक महिन्याच्या कालावधीत राबवले जातात आहे. रस्त्यांवरील 83 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. तामिळनाडू राज्याने एक वर्षात 53 टक्के रस्ते अपघात कमी केले. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचा आकडा कमी करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. दरवर्षी भारतात सुमारे दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगले उद्धिष्ट साध्य होईल.
सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, “जगात दरवर्षी 12 ते 13 लाख लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा कमी करण्यासाठी वाहन चालकांमध्ये वर्तनात्मक बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रशिक्षणाची मोठी मदत होणार आहे. प्रशिक्षणासाठी नागरिकांनी येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. वाहतुकीच्या नियमांचं पालन का करायचं हे या शिबिरातून सांगितलं जाईल.”





