मुख्यमंत्र्यांची सभा “उधळणार”; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/maratha-morcha-belgaum-600x333.jpg)
पिंपरी – मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य केल्या नसल्याने सकल मराठा समाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. केवळ आश्र्वासनाचे गाजर दाखवून मराठ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांची सभा होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धीसाठी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी राज्यभरात ५७ मुकमोर्चे काढले. तरीही या सरकारने मराठा समाजाला आश्र्वासनांच्या नावाखाली झुलवत ठेवले. या सरकार विरोधात मराठा समाजामध्ये असंतोष वाढला आहे. त्याचे पर्यवसान परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात उमटले आहेत. सरकारच्या भूमिकेवर मराठा समाज नाराज आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे.
जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री समाजात येऊन सभा घेऊ शकत नाहीत. तसेच चिंचवड येथील चापेकर संग्रहालयचा भूमीपूजनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सभा उधळली जाण्याची शक्यता आहे.