भाजपच्या ‘तीन’ वर्षांतील कारभाराची खुशाल चाैकशी करा; आमदार लक्ष्मण जगताप

नाव न घेता राष्ट्रवादी नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांना खुलं आव्हान
पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजप सत्ता आहे. गेल्या तीन वर्षाच्या कारभारात भाजपने कोणताही घोटाळा केलेला नाही अथवा चुकीच्या कामांना पाठिशी घातले नाही. त्यामुळे भाजपच्या तीन वर्षांचीच काय तर तीस वर्षांच्या संपुर्ण कारभाराची चाैकशी करा, आम्ही कोणत्याही चाैकशीला तयार आहोत, असं खुलं आव्हान पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते तथा भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा महाविकास आघाडीतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचं नाव न घेता चिंचवडचे आमदार जगताप यांनी आव्हान दिलं आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, महापाैर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अमित गोरखे, उमा खापरे, शैला मोळके, सीमा सावळे, अमोल थोरात, बाबू नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे प्रशांत शितोळे, शिवसेनेचे राहूल कलाटे सतत पालिकेच्या कारभारावरुन आमदार जगताप यांना टार्गेट करीत आहेत. तसेच पालिकेतील विविध निविदावरुन घोटाळ्याचे आरोप करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे चाैकशीची मागणी करु लागले आहेत.
आमदार जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. गेल्या तीन वर्षाच्या कारभारात चुकीची कामे आम्ही केलेली नाहीत. पालिकेत एकही घोटाळा भाजप पदाधिकारी अथवा नगरसेवकाने केलेला नाही. आम्ही सत्ता येताच आॅनलाईन निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे निविदा भरण्यास राज्यभरातून ठेकेदार सहभागी होत आहेत.
जिथं आम्हाला शंका येईल, त्या कामाची चाैकशी करण्याबाबत आयुक्तांना मी स्वताः पत्रक देत आहे. कोणत्याही घोटाळ्याशी भाजप पदाधिका-यांचा संबंध नाही. आम्ही अनधिकृत कोणतंही काम केले नाही. संपुर्ण निविदा प्रक्रिया कामकाज प्रशासन राबवत असून अटी-शर्थी देखील तेच टाकत असतात. त्यामुळे कुठल्याही निविदा प्रक्रियेची चाैकशी करा, तसेच पालिकेच्या तीन वर्षांची काय तर संपुर्ण तीस वर्षांची चाैकशी करा, चाैकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.





