पावणे दीड किलो गांजा पुनावळेत केला हस्तगत
पिंपरी – गांजा घेऊन चाललेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक किलो 660 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. रविवारी (ता. 25) दुपारी पुनावळे परिसरात ही कारवाई करण्यात आली.
झुबेर मौला अत्तार (वय 29, रा. संदीप गायकवाड चाळ, माळवाडी, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी प्रसाद जंगीलवाड यांना गांजाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी दुपारी पोलिसांनी सापळा लावला. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुनावळे येथील कोयते वस्तीकडून काटेवस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर एकजण संशयितरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये 22 हजार 650 रुपये किमतीचा एक किलो 660 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त, मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ, उपनिरीक्षक वसंत मुळे, कर्मचारी प्रदीप शेलार, राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, दादा धस, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे, पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.





