समन्स बजावल्यानंतर रिया चक्रवर्ती एनसीबी कार्यालयात दाखल

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. आज सकाळी एनसीबीची टीम मुंबई पोलिसांसह सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या घरी दाखल झाली होती. यावेळी तिला समन्स बजावण्यात आले. एनसीबीने समन्समधून रियाला चौकशीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात तिने स्वतःहून एनसीबीच्या कार्यालयात यावे किंवा एनसीबीच्या टीमसोबत चौकशीसाठी यावे, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी स्वतःहून चौकशीसाठी येण्याचा पर्याय रियाने निवडला. त्यानुसार ती एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकत घराची झाडाझडती घेतली होती. जवळपास 3 ते 4 तास झडती घेतल्यानंतर रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री जवळपास 10 वाजता शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली.





