धक्कादायक : कोविड सेंटरमध्ये काम करणा-या कर्मचारी महिलेचा सहाजणांनी केला विनयंभग

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोविड सेंटरमध्ये काम करणा-या कर्मचारी महिलेच्या घरात घुसून सहाजणांनी धक्काबुक्की करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ”तु कोरोनाबाधित रुग्णांच्या दवाखान्यात काम करतेस, इमारतीमध्ये तु खाली वर ये-जा करायचे नाही”, अशा शब्दांत सहाजणांनी दमबाजी करत पीडितेला मुलांच्या समोर आश्लिल चाळे करत बेदम मारहाण केली. हा प्रकार 2 मे रोजी घडला असून आजरोजी पोलीस आयुक्तांनी शिफारस केल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याप्रकरणी संतोष कुंभार, गणेश कुंभार, छाया कुंभार, सोनम कुंभार, आश्विनी कुंभार, सुहास कुंभार (सर्व रा. अनुराग बिल्डिंग सर्व्हे नंबर 61, अनंतनगर, साई मंदिराजवळ पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस आयुक्तांना तक्रारी अर्ज केला होता. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर त्यातील सत्यता पाहून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या कोविड सेंटरमध्ये काम करतात. कामावरून सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना पाणी भरायचे होते. पाणी आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्या इमारतीच्या छतावर जात होत्या. दरम्यान, छाया कुंभार यांनी त्यांना अडविले. ”तु वर कशाला चाललीस, तु कोरोना पेशंटच्या दवाखान्यात काम करते, तु वर येत जाऊ नकोस”, असे म्हणून त्यांना वर जाण्यास अटकाव केला. ”हिला खाली ढकलून द्या, हिला नवरा नसल्याने माज आला आहे. हिला दुसरा नवरा करा, तेव्हाच हिचा माज उतरेल”, असे म्हणून पीडित महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यावर संतोषने ”आता हिचा माजच उतरवतो” असे म्हणत पीडितेच्या अंगावर धावून गेला. दरम्यान, स्वतःचा बचाव करण्यासाठी पीडित महिला स्वतःच्या घरात गेल्यानंतर सोनम आणि अश्विनी यांनी घरात घुसून त्यांच्याशी धक्काबुक्की केली.
पीडित महिलेची मुले टॅबमध्ये रेकॉर्ड करताना तो टॅब हिसकावून घेतला. त्यावेळी संतोषने काठीने महिलेला मारहाण केली. महिला खाली पडल्यानंतर त्यांच्या अंगावर पडून त्यांच्याशी झटापट करू लागला. दरम्यान, सर्वांनी पीडितेवर हल्ला चढवून त्यांचा विनयभंग केला. संतोष आणि गणेश या दोघांनी पीडितेला खाली पाडून त्यांच्यासोबत आश्लिल चाळे केले. मुलांना शाळेतून मिळालेला टॅब देखील फोडून टाकला. याप्रकरणी सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.





