१९ वर्षांनंतर ‘कुरळे ब्रदर्स’चे पुनरागमन; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची तारीख जाहीर

Punha Ekda Sade Made 3 Release Date | मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुन्हा एकदा साडे माडे तीन या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘साडे माडे तीन’चा पहिला भाग आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. भावंडांमधील जिव्हाळा, निरागस विनोद आणि पोट धरून हसवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला. आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर, त्याच आठवणींना उजाळा देत आणि आजच्या काळाशी सुसंगत अशी कथा घेऊन हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी करत असून, त्यांच्या अनुभवामुळे यावेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी वाहनांसाठी NA नवीन मालिका सुरू
चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार
अभिनेत्री समृद्धी केळकर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत असून, यापूर्वी तिने फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतही मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने समृद्धीला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे.
अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केलं आहे.





