चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील प्रकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201105-WA0000.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
निगडी अमरधाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून अंत्यविधीच्या ठिकाणी पथदिवे नसल्याने तेथे अंत्यविधीसाठी येणा-या नागरीकांना चक्क मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याठिकाणी पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माणसाच्या जीवनाची फरफट त्याच्या मृत्यूनंतरही सुरूच आहे. याचा प्रत्यय निगडी येथील स्मशानभुमीत आला आहे. बिजलीनगर, प्राधिकरण, रूपीनगर निगडी, त्रिवेणीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी निगडी स्मशानभूमीत येत असतात. सायंकाळी अंत्यविधी करताना पथदिवे नसल्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना काळोखातच अंत्यविधीची तयारी करावी लागत आहे.
अक्षरशः मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ज्या कुटुंबात अशी दुर्दैवी घटना घडत आहे, त्या कुटुंबातील सदस्यांना अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या भावना काय असतील याचा विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे. मात्र, महापालिकेने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप दिपक खैरनार यांनी केला आहे.