breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड: महापालिका सोसायटीमधील थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करणार!

सोसायट्यांना मिळणार तीन दिवसांची लेखी मुदत : प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी धडाकेबाज निर्णय घेतले जात आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका सोसायटीमधील सदनिकाधारक थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायटीमधील थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाला १ हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल ८६० कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, एक हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आता या प्रयत्नांना उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे आर्थिक वर्षातील उर्वरित ११ दिवसांत जास्तीत जास्त कर वसूल करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र शासन, वसई विरार महापालिकेसह इतरांविरोधात विरोधात २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. १५ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाच्या निर्णयाची प्रत पिंपरी-चिंचवड महापालिकेला नुकतीच प्राप्त झाली आहे. यापूर्वीही महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदाराचे सोसायटीमधील नळ कनेक्शन खंडित करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार शहरातील काही मोठ्या सोसायट्यांमधील नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत.

हेही वाचा – ‘अहमदनगरमध्ये आम्ही तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाही’; जयंत पाटलांचं विधान

उच्च न्यायालयात महापालिका मालमत्ता करासाठी नळ कनेक्शन खंडित करू शकते की नाही? या संदर्भात ही याचिका दाखल होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने मालमत्ता धारक कर भरण्यास नकार देत असतील तर ही चिंतेची बाब असल्याचे महत्व पूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कर न भरता मालमत्ता धारकांना महापालिकेच्या सेवा सुविधा हव्या असतील तर आम्ही वसई विरार महापालिकेला थकबाकी वसूल करण्यासाठी कायद्याने जे काही नियम आहेत, ते वापरण्यापासून आम्ही प्रतिबंध घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरात अशा अनेक सोसायट्या आहेत ज्यामध्ये हजारो सदनिकाधारकांकडे थकबाकी आहे. मात्र, संबंधित सोसायटीमधील काही सदनिका धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी भरलेली असते. अशावेळी संबंधित सोसायटीचे नळ कनेक्शन खंडित करता येत नाही. त्यामुळे महापालिकेने संबंधित सोसायटीला एक विशिष्ट कालमर्यादा द्यावी. त्या सोसायटीमधील थकबाकीदाराचे जे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्याच्या सूचना महापालिकेने संबंधित सोसायटी धारकांना द्याव्यात. त्या सुचनेनुसार सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी थकबाकीदाराचे नळ कनेक्शन खंडित केले नाही तर महापालिकेने स्वतः हून नळ कनेक्शन खंडित करावे. परंतु महापालिकेच्या सेवा सुविधा मालमत्ता धारकांना घ्यायच्या असतील तर मालमत्ता कर, पाणीपट्टीसह इतर कर भरणे आवश्यक आहे. याबद्दल उच्च न्यायालयही आग्रही असल्याचे म्हटले आहे.

थकबाकीदारांची यादी सोसायटी बोर्डावर प्रकाशित होणार

थकबाकीदार सोसायट्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आणि थकबाकीदारांची यादी संबंधित सोसायटीच्या व्हाॅटसॲप ग्रुपवर तसेच नोटीस बोर्डावर प्रकाशित करण्यासाठी महापालिकेमार्फत सांगण्यात येणार आहे. सोसायटीमधील थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी तीन दिवसांची लेखी मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी थकबाकीदारांच्या ही बाब निदर्शनास आणून द्यावी. त्यानंतरही नळ कनेक्शन खंडित न केल्यास महापालिकेच्या पथकामार्फत नळ कनेक्शन खंडित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे सोसायटीमधील सभासदांची होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. सोसायटीमधील थकबाकीदार सदनिका धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया उद्या गुरुवारपासूनच राबविण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी आपली मानहानी टाळण्यासाठी त्वरित थकीत कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय नुकताच प्राप्त झाला आहे. गट वर्षी पालिकेने काही सोसायट्यामध्ये अंतर्गत नळ कनेक्शन खंडित केलेलेही होते. मात्र आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने संबंधित थकबाकीदार याचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई विधिग्राह्य ठरवली आहे. त्यामुळे उद्यापासून याची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसे आदेश कर संकलन विभागाला देण्यात आले आहेत.

 – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button