breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शिवसेनेतील नाराज नगरसेवक भाजपाच्या संपर्कात!

  • शिवसेना जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या वक्तव्याने खळबळ 
  • नगरसेवक राहुल कलाटे यांच्यामुळे पक्षातील काहीजणांवर अन्याय

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. नगरसेवक राहुल कलाटे यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कलाटे यांना पक्षातील काही मंडळी पाठीशी घालत आहे. त्यामुळे काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी कबुली जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी दिली आहे.

महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी मंगळवारी गटनेतेपदाचा राजीनामा दिला. पक्षादेश आणि पक्षशिस्तीमुळे राजीनामा दिल्याचे कलाटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक २५ वाकड-ताथवडे-पुनावळे- काळाखडक या भागातून राहुल कलाटे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत आहेत.

मात्र, शिवसेनेतील मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि कलाटे यांच्यात राजकीय रस्सीखेच आहे. बारणे समर्थक नगरसेवकांना कलाटे यांनी महापालिकेतील स्थायी समिती सदस्य, स्मार्ट सिटी अशा महत्त्वाच्या पदांवर डावलल्याची भावना आहे.

जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे म्हणाले की, पक्षनेतृत्वाने शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. मात्र, राहुल कलाटे यांनी राजीनामा दिला नाही. स्थायी समिती सदस्यपदासाठी शिवसेनेच्या कोट्यातून आश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाकडून निश्चित करण्यात आले होते. मात्र, कलाटे यांनी आपल्या समर्थक नगरसेविका मीनल यादव यांचे नाव पुढे केले. पक्षशिस्तीचा भंग केला. पक्षातील काही मंडळी कलाटे यांना पाठिशी घालत आहे, त्यामुळे अनेकजण नाराज आहेत. नाराज नगरसेवक आता भाजपाच्या संपर्कात आहेत.

स्थायी समिती सदस्यपदावरुन वाद पेटला…

पक्षादेशाचे उल्लंघन करुन स्थायी समिती सदस्यपदी नगरसेविका मीनल यादव यांचे नाव दिल्यामुळे शहर शिवसेनेत वाद पेटला. नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्यासह शहरप्रमुख योगेश बाबर, उर्मिला काळभोर यांनी कलाटे यांच्यावर हल्लाबोल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button