breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड: आयुक्त साहेब जागे व्हा… कृत्रिम पाणीटंचाई विरोधात मनसे रस्त्यावर

पिंपरी : आठ दिवसात पिंपरी चिंचवड शहरातील कृत्रिम पाणीटंचाई दूर करा अन्यथा सर्व प्रशासकीय यंत्रणेला शहर मनसे ‘पळता भुई थोडी करील’, गर्भित इशारा पिंपरी चिंचवड शहर मनसेने पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे. शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. ३०) रोजी पिंपरीतील पालिका आवारात आंदोलन केले. यावेळी झोपी गेलेल्या प्रतीकात्मक राक्षसाला जागे करत, आयुक्त साहेब जागे व्हा.. जागे व्हा.. या झोपी गेलेल्या आयुक्तांचे करायचे काय? अशा निषेधाच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे, पिंपरी चिंचवड शहरात भर पावसाळ्यात पालिका प्रशासनाकडून कृत्रिम पाणीबाणी सुरु आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविणारी महापालिका शहरवासियांना पुरेसे पिण्याचे पाणी देऊ शकत नसेल तर, त्याचा कारभार हाकणारे प्रशासन याला जबाबदार आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे सांगत, अल्प काळासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन दिले होते. आज जवळपास अडीच वर्ष उलटले तरी ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर कायम आहे. शहरात नियमित आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा केव्हा होणार? याचा खुलासा करा.

आंद्रा व भामा आसखेड धरणातून १०० एमएलडी पाणी महिनाभरात देण्याचे आश्वासन आपण दिले होते. त्याचे पुढे काय झाले? चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची मुदत संपून अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. तुम्ही ठेकेदारावर काय कारवाई केली? याचाही खुलासा करा. जमत नसेल तर खुर्ची खाली करा. मनसे आपणासह प्रशासनाला केवळ आठ दिवसांचा अल्टीमेट्म देत आहे. आठ दिवसात शहरातील कृत्रिम पाणीटंचाई आपण दूर शकला नाहीत तर, आपणासह सर्व प्रशासकीय यंत्रणेला शहर मनसे ‘पळता भुई थोडी करील’. निवेदनाची वेळेत दखल घेऊन नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्या, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button