पिंपरी / चिंचवड

शहरातील 207 कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थायीची मंजुरी

पिंपरी l प्रतिनिधी

शहरातील सीसीटीव्ही  प्रकल्पासाठी 178 कोटी 48 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या विषयासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकासकामांच्या सुमारे 207 कोटी 74 लाख रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाकरीता सन 2021-22 च्या अर्थ संकल्पात महापालिका सभेने 200 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर केली आहे.  सीसीटीव्ही सर्व्हेलन्स कामासाठी पोलीस दल ,  नागरिक आणि नगरसदस्यांची मागणी  विचारात घेता सीसीटीव्ही यंत्रणेचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी  178 कोटी 48 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

पिंपळे गुरव येथील जिजाऊ उद्यानाची देखभाल करण्यासाठी 85 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. इ प्रभागातील पाण्याच्या टाकीखाली वॉचमन क्वार्टर बांधण्यासाठी 45 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 16 मधील रावेत भागातील गुरुद्वारा परिसरातील पेव्हिंग ब्लॉक, स्टॉर्म वॉटर लाईनची दुरुस्ती आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 26 लाख रुपये, इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग 4 आणि 5 मध्ये ड्रेनेज लाईन आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 78 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक 23 मध्ये सर्वे नंबर 1 येथील सीमाभिंत बांधण्यासाठी आणि वाहनतळ विकसित करण्यासाठी 35 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. प्र.क्र. 26 पिंपळे निलख येथे विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या खोदाईचे चर बुजवण्याकरीता आणि आवश्यकतेनुसार रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी 92 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

रावेत भागातील गुरुद्वारा व  रजनीगंधा परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी 65 लाख रुपये  खर्च होणार आहे. तर मैलाशुध्दीकरण केंद्रातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी  तसेच स्थापत्य विषयक कामांसाठी 1 कोटी 24 लाख रुपये खर्च होतील.  या विषयासही स्थायी समितीने मंजूरी दिली. नविन भोसरी रुग्णालयात तळ मजल्यावर वाचनालयासाठी आरक्षित असणा-या 4 हजार चौरस फुट जागेत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारण्यास मागील महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. या ग्रंथालयासाठी आज स्थायी समितीने ऐनवेळच्या विषयामध्ये 15 लाख रुपये मंजूर केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button