पुणे

कृषिपंप वीजबिल थकबाकीमुक्तीसाठी ऐतिहासिक संधीचा लाभ घ्या

मुख्य अभियंता सचिन तालेवार यांचे आवाहन

पुणे l प्रतिनिधी

कृषिपंप वीजबिलांच्या मूळ थकबाकीमध्ये सुमारे 66 टक्क्यांपर्यंत सवलत घेऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी येत्या मार्च 2022 पर्यंत संधी आहे. या ऐतिहासिक संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच गाव व जिल्ह्यामध्ये नवीन वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणास हातभार लावावा असे आवाहन महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले.

मुळशी तालुक्यातील वरवे खुर्द येथील गावकऱ्यांशी बुधवारी (दि. 26) कृषी धोरणाबाबत संवाद साधताना मुख्य अभियंता तालेवार बोलत होते. दरम्यान प्रजासत्ताकदिनी पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी- 17, मंचर- 23 व राजगुरुनगर विभागातील 18 अशा एकूण 58 गावांमध्ये ग्राहक संवाद व मेळावे आयोजित करून कृषी धोरणाची माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांचा कृषी धोरणात सहभाग वाढवावा असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लोकप्रतिनिधींना लेखी पत्राद्वारे केले आहे. हे पत्र देखील लोकप्रतिनिधींना सुपुर्द करण्यात आले.

वरवे खुर्द येथील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी कृषी धोरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील 41 हजार 722 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून 15 हजार 866 शेतकरी थकबाकीमुक्त झालेले आहेत. सोबतच कृषी ग्राहकांनी भरलेल्या चालू व थकीत वीजबिलांमधील प्रत्येकी 33 टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. त्यातून नवीन उपकेंद्र, उपकेंद्र रोहित्रांची क्षमतावाढ, वितरण रोहीत्र, लघु व उच्चदाब वीजवाहिन्या आदी वीजयंत्रणेची उभारणी करणे, कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देणे, दिवसा वीजपुरवठा आदी कामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसोबतच गावातील व जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य अभियंता तालेवार यांनी केले. यावेळी उपकार्यकारी अभियंता नवनाथ घोटुळे, सरपंच नीलेश भोरडे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

येत्या मार्चपर्यंत सध्याच्या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. या तरतूदीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी प्रजासत्ताक दिनापासून पुणे परिमंडलामध्ये ग्राहकसंवाद व मेळाव्यांच्या आयोजनास सुरवात करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना वीजबिलांबाबत काही शंका व तक्रारी असल्यास त्याचेही ताबडतोब निराकरण करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी पुणे परिमंडलामध्ये 58 गावांमध्ये ग्राहक संवाद व मेळावे आयोजित करून धोरणाची माहिती देण्यात आली.

कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे (राजगुरुनगर), हेमचंद्र नारखेडे (मंचर) व माणिक राठोड (मुळशी) यांच्यासह सर्व उपविभागांचे अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध गावांमध्ये कृषी धोरणाबाबत जनजागृती केली. तसेच तहसील व पंचायत समितीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना धोरणाची माहिती देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button