breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC | पिंपरी-चिंचवड भाजपामधील खडसे समर्थक मोठा पदाधिकारी राजिनाम्याच्या तयारीत !

–      शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगेंसमोर आव्हान

–      चिंचवड विधानसभा मतदार संघातही बसणार फटका

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील नाराजांना ‘गळ’ लावण्याची रणनिती आखली आहे. त्यातील पहिला दणका ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रुपाने बसला आहे.

राज्याभरातील ‘ओबीसी’ समाजात खडसे नावाचे वलय आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघात एकानाथ खडसे यांना माननारा मोठा मतदार आहे. विशेष म्हणजे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी खडसेंनी सभा घेतल्याचाही दाखला दिला जातो.

दरम्यान, शहर भाजपातील ओबीसी सेलच्या महिला शहराध्यक्षा सारिका पवार यांनी नुकताच राजीनामा दिला. ‘‘ आपले नेते हे एकनाथ खडसे आहेत. त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. तसेच, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे, ’’ असा उल्लेख सारिका पवार यांनी शहराध्यक्ष महेश लांडगे यांना दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील खडसे यांचा कट्टर समर्थक असलेला एक मोठा पदाधिकारी यांचीही अस्वस्थता वाढली आहे. दिवाळीनंतर शहरातील खडसे समर्थक राजकीय फटाके फोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये ‘तो’ मोठा पदाधिकारी राजीनामा देणार आहे, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात रंगली आहे.

शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये सांगवी, काळेवाडी आणि बिजलीनगर परिसरात खानदेशातील नागरिक मोठ्या संख्येने आहेत. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघातील दिघी परिसरात खानदेशी मतदारांची संख्या जास्त आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या भागातील प्रभागांमध्ये ‘खडसे प्रभाव’ जाणवणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

खडसे समर्थक असल्याने माझी उमेदवारी डावलली…

सारिका पवार यांनी पक्षात अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. शहर भाजपाने माझ्या कार्याची दखल घेतली नाही, अशी त्यांची खंत आहे. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये केवळ खडसे समर्थक असल्यामुळे पूर्णानगरमधून माझी उमेदवारी डावलण्यात आली, असा आक्षेपही पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे शहर भाजपामध्येसुद्धा खडसे समर्थक अस्वस्थ आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांना मानणारा एक गट भाजपामधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहे, अशी चर्चा शहर भाजपामध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button