breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । प्रतिनिधी

सिनेमा, नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळया विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेडयापाडयात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फ्लिम मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह मुख्य सचिव संजय कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, निर्माते सिध्दार्थ रॉय कपूर, टी.पी.अग्रवाल. अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मनोरंजन हे एकमेव असे माध्यम आहे जिथे आपण आपले दु:ख काही वेळा करीता का होईना विसरुन जातो. मनोरंजन क्षेत्र असे या क्षेत्राचे नाव असले तरी हे क्षेत्र मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे काम करीत असते. आणि याच क्षेत्रामुळे एक चांगला समाज घडण्यास मदत होत असते. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. राज्य शासनाचा एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार हे एक उत्तम माध्यम आहे. कारण जनमानसात कलाकारांची असलेली लोकप्रियता आणि त्यांच्या मनातील स्थान त्यास कारणीभूत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील कलाकरांच्या पाठिशी राज्य शासन कायम उभे असून कलाकारांना बळ देण्याचे काम करण्यात येईल.

आज हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असल्याचे श्री. ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या अनेक वर्षात या क्षेत्रातून अनेक कलाकार घडले पण याच क्षेत्रामुळे अनेकांना रोजगारही मिळाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या चित्रीकरणासाठी चांगली जागा विकसित करणे, नव नवीन तंत्रज्ञान आणणे यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबईत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे येणाऱ्या काळात दर्जोन्नती करण्यावर भर असेल. आज देशासह राज्यावरही कोविड-19 चे संकट आहे. गेल्या आठ महिन्यानंतर आजपासून सिनेमागृहे/नाटयगृहे 50 टक्के क्षमतेसह सुरु होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला बळकटी देत असताना प्राधान्याने कोणते काम पहिले करण्याची आवश्यकता आहे हे ठरविणे आवश्यक असल्याचेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. चित्रपट व करमणूक माध्यम क्षेत्र गतीमान व्हावे यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. पहिल्यांदाच अशा प्रकारे चर्चासत्र आयोजित करुन या क्षेत्राला उभारी देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे.या अनुषंगाने प्रस्तावित चित्रपट, मनोरंजन व माध्यम धोरण असावे या मुख्य उद्देशातूनच तीन दिवस चालणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या सत्राचा उद्देश या क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान बळकट करणे, राज्य चित्रपट निर्मिती आणि मनोरंजन माध्यम केंद्र प्रस्थापित करणे आणि या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे असा असणार आहे.
चित्रीकरण केंद्र बनविणे,चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देणे,चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्राच्या वाढीसाठी सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे, प्रादेशिक चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देऊन चित्रपट,माध्यम व करमणूक क्षेत्रातील कौशल्य विकास वृद्धिंगत करणे यासारख्या सर्वांगीण विषयांचा समावेश असणार आहे.

या चर्चासत्राच्या दरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाचे कौतुक केले. आज मुंबई हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असताना आजच्या काळात चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी ठोस सूचना मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या चर्चासत्रात चित्रपट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि अनेक नामवंत तज्ञ मंडळी सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button