breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत चौकशी समितीला एक महिन्याची मुदतवाढ

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी आहे. या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या विनंतीनुसार, शासनाने समितीला एक महिन्याकरिता मुदतवाढ दिली असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी येथील व्यवस्थेबाबत श्री सदस्यांसोबत तसेच संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून वेळेच्या निश्चितीसह सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. येथील व्यवस्थेमध्ये ३५०० श्री सदस्य सहभागी झाले होते. व्यवस्थेबाबत सर्व नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली होती. कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित अनुयायांसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, प्रथमोपचार किट, रूग्णवाहिका, सुलभ शौचालय, दळणवळण व्यवस्था, वाहनतळ, मैदान साफसफाई, कार्यक्रम सुकरपणे पाहता यावा यासाठी ३० मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था आदी आवश्यक सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. लाखो नागरिक उपस्थित राहणार असल्याने आणि ३०६ एकर क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित होणार असल्याने मंडप टाकल्यास हवा खेळती राहण्यास समस्या निर्माण होईल, यामुळे तो निर्णय घेण्यात आला नाही. हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आलेल्या तापमानाच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्षात तापमान आणि आर्द्रता अधिक वाढल्याने समस्या निर्माण झाली. तथापि, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी चार हजार खाटांची व्यवस्था ठेवण्यात आली होती असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – ‘इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू, ११९ जणांना वाचवण्यात यश’; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

दुर्घटना घडल्यानंतर शासनामार्फत जिल्हाधिकारी, तहसीलदार घटनास्थळी गेले होते. मृत्यू झालेल्या १४ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनामार्फत प्रत्येकी ५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून एक विशेष बाब म्हणून करण्यात आल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. धर्माधिकारी कुटुंबियांकडून देखील प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत केल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत करार करण्यात आलेल्या कंपनीने करारानुसार काम केले किंवा नाही याचा खुलासा तपासणी अहवालानंतर होईल असे ते म्हणाले. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी शासन दक्षता घेत आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री कपिल पाटील, शशिकांत शिंदे, ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button