TOP Newsताज्या घडामोडीपुणे

बिहारी मजुरांच्या जोरावर द्राक्षमळे सांगलीत दहा हजारांवर बिहारी मजूर

पुणे: स्थानिक पातळीवरील मजूर टंचाई आणि वाढलेल्या मजुरीवर उपाय म्हणून सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांनी बिहारमधील मजूर आणून, त्यांना द्राक्षबागेत काम करण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. कमी मजुरी, दिवसभर काम करण्याच्या क्षमतेमुळे तासगावसह जिल्ह्याच्या पूर्वभागातील द्राक्ष मळे बिहारी मजुरांच्या जोरावर बहरत आहेत.

सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी भागात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठे आहे. या भागात द्राक्ष हंगाम साधारण एकाच वेळी सुरू होतो. परिणामी हंगामात मोठी मजूर टंचाई निर्माण होते. या मजूर टंचाईवर मात करण्यासाठी २०१०-११च्या हंगामात पहिल्यांदा सोनी (ता. मिरज) गावातील शेतकऱ्यांनी बिहार येथून मजूर आणले. त्यानंतर मणेराजुरीसह अन्य गावांत बिहारी मजूर येऊ लागले. आता सांगली जिल्ह्यातील द्राक्ष मळय़ात काम करणाऱ्या बिहारी मजुरांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या मजुरांना द्राक्षांच्या बागेत काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. द्राक्ष बागायतदार सांगतील त्या पद्धतीने ते काम करतात.

वेळ, पैशांची बचत

द्राक्ष हंगामात पुरुष मजूर सकाळी आठ ते दुपारी तीन या सात तासांसाठी ४००, तर महिला ३०० रुपये घेतात. बिहारी मजूर स्थानिक मजुरांच्या तुलनेत थोडी कमी मजुरी म्हणजे ४०० रुपये घेऊन सकाळी आठ ते सायंकाळी पाच, सहापर्यंत म्हणजे नऊ तास काम करतात. त्यामुळे ऐन हंगामात कामाचा उरका होतो. काही शेतकऱ्यांनी बिहारी मजुरांची टोळीच आणून ठेवली आहे. मजुरांना राहण्याची सोय करून दिली जाते. शेतकरी या बिहारी मजुरांना एक एकर (४० आर) बागेतील कामे करण्यास साधारण ३२ हजार रुपये देतात. हीच कामे स्थानिक मजुरांकडून करून घेतली तर ५० हजार रुपयांवर जातात. त्यामुळे बिहारी मजुरांकडून काम करून घेणे शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरते.

ऐन हंगामात मोठी मजूर टंचाई निर्माण होते. बागेतील कामे वेळेवर होत नाहीत. वातावरणात बिघाड झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी बिहारी मजुरांकडून काम करून घेण्यास प्राधान्य देतात. जिल्ह्यात द्राक्षबागेत काम करणाऱ्या मजुरांची संख्या आठ हजारांच्या पुढे असावी.

– चंद्रकांत लांडगेसंचालक महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघपुणे

बिहारी मजुरांकडून काम करून घेणे आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरते. बिहारी मजूर आले नाहीत, तर मजूर मिळत नाही किंवा मजुरीचे दर परवडत नाहीत म्हणून द्राक्षबागा काढून टाकाव्या लागल्या असत्या. बिहारी मजुरांवरच आमच्या बागा अवलंबून आहेत.

– केशव काशिदद्राक्ष बागायतदार शेतकरी (तासगाव)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button