TOP Newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी जूना उड्डाणपूल पाडण्यात येणार

मुंबई | मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी जूना उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. रविवारी (उजाडता २ ऑक्टोबर) मध्यरात्री दोन वाजता हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (१ ऑक्टोबर) रात्री ११ वाजल्यापासून रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.

चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल पाडण्याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक झाल्यानंतर वाहतूक पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २ ऑक्टोबर सकाळी आठ या कालावधीत चांदणी चौकातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून येणारी जड वाहतूक तळेगाव दाभाडे पथकर नाक्याच्या (टोल नाका) अलीकडे, तर साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक खेड-शिवापूर परिसरात थांबविण्यात येणार आहे. पूल पाडण्याच्या कामासाठी वाहतूक बंद कालावधीत केवळ हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या कालावधीत नागरिकांनी शक्यता प्रवास टाळावा. काही अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी हलकी वाहने जून्या पुणे-मुंबई पथकर नाक्यावरून (टोल नाका) सोमाटणे फाटा, देहू रोड, भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, खडकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक (म़ॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्ता, कात्रज चौकातून साताऱ्याकडे जाऊ शकणार आहेत. तसेच मुंबईवरून वाकड येथे आल्यानंतर राजीव गांधी पूलावरून औंध, आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील चौक), संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे मार्गस्थ होतील. याशिवाय मुंबईवरून बाणेर येथे आल्यानंतर विद्यापीठ चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि स्वारगेटवरून सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे जाता येणार आहे.

दरम्यान, हलक्या वाहनांसाठी साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना जुना बोगदामार्गे कात्रज-स्वारगेट-टिळक चौक-शिवाजीनगर-विद्यापीठ चौकातून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून थेट महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाऊ शकतील. साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना दुसरा पर्यायी रस्ता नवले पूल, वडगाव पूल, सिंहगड रस्ता, राजाराम पूल, स्वर्गीय राजा मंत्री पथावरून (डीपी रस्ता), नळस्टॉप, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येईल किंवा साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना तिसरा पर्यायी रस्ता वारजे पूल, कर्वे रस्त्याने आंबेडकर चौक, वनदेवी, कर्वे पूतळा चौक, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येईल, असे श्रीरामे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button