breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

वापरातील वसतिगृहाचे राज्यपालांकडून आज उद्घाटन!

नांदेड |

भाजपच्या राजवटीत राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून बांधलेले आणि गेल्या तीन वर्षांपासून वापरात असलेल्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी होत आहे. राज्यपालांच्या नियोजित दौऱ्यावरून राजकीय वादंग निर्माण झालेले असतानाच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अजब कारभाराची माहिती समोर आली. राज्यपालांचा नांदेड-हिंगोली आणि परभणी जिल्हा दौरा बुधवारी जाहीर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी तोफ डागली. नांदेडच्या विद्यापीठात सरकारच्या खर्चातून बांधलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल परस्पर करत असल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी व्यक्त झाली. मलिक यांच्या आक्षेपानंतर भाजपकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या दौऱ्याचे समर्थन केले.

काही महिन्यांपूर्वी ‘नॅक’च्या मूल्यांकनानंतर या विद्यापीठाची मानांकनात घसरण झाली होती. ‘नॅक’च्या समितीला विद्यापीठ अधिकाऱ्यांनी अशैक्षणिक कामे दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यातील एका सदस्याने हे कृषी विद्यापीठ आहे काय, अशी पृच्छा खोचकपणे केली होती आणि आताही राज्यपालांना जलपुर्नभरण, जलसंधारण ही कामे दाखविण्यात येणार आहेत. विद्यापीठातील श्री गुरू गोविंदसिंहजी अध्यासन संकुल आणि संशोधन केंद्राच्या बांधकामासाठी मागील काळात २५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातील अर्धी रक्कमही प्राप्त झाली; पण ज्या योजनेतून वरील रक्कम मंजूर झाली, ती योजना बंद झाली तरी विद्यापीठ प्रशासनाने त्या बांधकामाला सुरुवात केली नाही. तिजोरीत १२.५० कोटी रुपये आणि बांधकाम खर्च २२ कोटी अशी स्थिती असल्याचे वरील केंद्रातून समजले. राज्यपालांना हे संकुलही दाखविले जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या महिन्यात उन्हाळी परीक्षा सुरू केल्या; पण अक्षम्य गोंधळामुळे त्या थांबविण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठातील ‘प्लेसमेन्ट सेंटर’ विद्यमान कुलगुरूंनी बंद केले, प्रशासनात प्र.कुलगुरूंच्या अधिकार क्षेत्रावर कुलगुरूंची ढवळाढवळ होत आहे. या व इतर गंभीर बाबींची तक्रार कुलपतींकडे करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भगतसिंग कोश्यारी येथे काही बाबींची चौकशी करणार आहेत, असे सांगण्यात आले.

  • मंत्री चव्हाण यांचा कोकण दौरा

या राजकीय वादात नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अशोक चव्हाण व प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही; पण राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान हे दोन्ही नेते आपापल्या जिल्हा मुख्यालयी हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात आले. मंत्री अशोक चव्हाण गुरुवारी कोकण दौऱ्यावर जात असल्याची माहिती मिळाली.

  • चर्चा काय?

तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या आणि वापरात असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्याचा घाट कुलगुरूंनी घातला असल्याचे विद्यापीठातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीस आता तीन वर्षे पूर्ण होत आली आहेत; पण गेल्या ३५ महिन्यांत त्यांना विद्यापीठातील एकाही नव्या प्रकल्पासाठी नव्याने निधी आणता आलेला नाही, त्यामुळे आधीच बांधलेल्या जुन्या इमारतीचे उद्घाटन आता होत असल्याबद्दल ‘स्वारातीमम’ध्येही चर्चा सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button