शिंदे गटाला मंत्रालयासमोर कार्यालय; विधिमंडळात एका पक्षाच्या नावे दोन कार्यालये
मुंबई । महाईन्यूज ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना विधिमंडळ पक्षाला कार्यालय म्हणून मंत्रालयासमोरील ब्रह्मगिरी म्हणजेच क १ हा बंगला देण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. हे कार्यालय शिंदे गटाचे असून शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मूळ कार्यालय उद्धव ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे आता विधान भवनात एका पक्षाची दोन स्वतंत्र कार्यालये झाली आहेत.
विधिमंडळात ज्या पक्षाचे सदस्य असतात त्यांच्यासाठी विधिमंडळाकडून स्वतंत्र कार्यालय देण्यात येते. शिवसेनेला दिलेले कार्यालय विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावर आहे. शिंदे गटाने त्यावर दावा सांगितला होता, मात्र विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशाने त्या कार्यालयावर उद्धव ठाकरे गटाचा अधिकार कायम राहिला. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाला तात्पुरत्या स्वरूपात सातव्या मजल्यावर छोटेखानी जागा देण्यात आली होती. आता शिंदे गटाला मंत्रालयासमोरील मंत्र्यांसाठी असलेला बंगला कार्यालय म्हणून देण्यात आला आहे.
शिंदे गटाकडे विधिमंडळात ४० सदस्य असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे दोन्ही सभागृहांचे मिळून २७ सदस्य आहेत. आश्चर्य म्हणजे दोन्ही गटांना शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून विधिमंडळ सचिवालयाने मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटाचे मंत्रालयासमोरील बंगल्यात शिवालय नावाने पक्ष कार्यालय आहे, तर शिंदे गटाला अद्याप पक्ष कार्यालयासाठी सरकारी जागा मिळाली नाही.