ताज्या घडामोडीमुंबई

अटकेची टांगती तलवार, चहुकडून कोंडी, नाईकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

नवी मुंबई | ऐरोलीचे भाजप आमदार आणि नवी मुंबईचे धडाडीचे नेते गणेश नाईक  सध्या अडचणीत सापडले आहेत. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने त्यांना फरार व्हावं लागलं आहे. महिलेच्या तक्रारीनुसार बेलापूर आणि नेरुळमध्ये नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ४ दिवसांपासून नाईक नॉट रिचेबल आहे. त्यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना जोरदार आंदोलन करत आहे. नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अटकेची टांगती तलवार असलेल्या नाईकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. अटकेआधी नोटीस देण्यात यावी, यासाठी ठाणे सत्र न्यायालयात हा अर्ज नाईकांकडून दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील एका महिलेने आठवड्याभरापूर्वी गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. १९९३ पासून गणेश लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला. तसंच आपल्याला या संबंधातून पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचं देखील महिलेने म्हटलं आहे. तशी रितसर तक्रार तिने पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी तक्रार देऊनही कारवाई केली नसल्याने संबंधित महिलेने महिला आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली. ज्यानंतर तपासाची चक्रे वेगात फिरली आहेत.

गणेश नाईक यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. कोपरखैरणे येथील घर आणि कार्यालय तसंच मुरबाडमधील फार्म हाऊसवर पोलिसांकडून नाईक यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांकडून त्यांना अटक होऊ शकते.

नाईकांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आंदोलन

बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चार दिवस लोटल्यानंतरही गणेश नाईक यांना अटक न करण्यात आल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला आघाडीने आक्रमक आंदोलन केले. आमदार नाईक यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही महिलेच्या आरोपाची गंभीर दखल घेऊन नाईकांना अटक करण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. तसंच नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाल्याचंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारदार महिला १९९३मध्ये वाशी सेक्टर-१७मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी नाईक वारंवार क्लबमध्ये बैठकीसाठी येत असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करत होते. सन १९९५पासून आमच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी नाईक यांनी मला पारसिक हिल येथील बंगल्यात नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यात फिरण्यासाठी गेल्यानंतरही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले, असे या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

नोव्हेंबर २००६मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात एप्रिल २००७मध्ये त्यांच्या सांगण्यावरून मी न्यू जर्सी येथे राहण्यास गेले व १८ ऑगस्ट २००७मध्ये मुलाला जन्म दिला. तो दोन महिन्यांचा असताना नाईक स्वत: मला व मुलाला घेण्यासाठी अमेरिकेला आले होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले, अशी तक्रार या महिलेने केली. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button