breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

“नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत”, नागपूरमधील विजयानंतर बावनकुळेंचे वक्तव्य!

मुंबई |

राज्यातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकीपैकी चार ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, नागपूर आणि अकोला या ठिकाणी एकमत होऊ न शकल्यामुळे तिथे निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपा आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. मात्र, नागपुरात काँग्रेसनं ऐनवेळी उमेदवार बदलून घडवलेलं नाट्य भाजपाच्या चांगलंच पथ्यावर पडल्याचं निकालांवरून दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनी काँग्रेसच्या पराभवासाठी नाना पटोलेंची हुकुमशाही पद्धत कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे.

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत एकूण ५४९ मतं वैध ठरली. त्यापैकी विजयासाठी २७५ मतं मिळवणं आवश्यक असताना बावनकुळेंना तब्बल ३६२ मतं मिळाली. तर रवींद्र भोयर यांना अवघं एक मत मिळालं. त्यासोबतच काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतंच मिळवता आली. या निवडणुकीत काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणावर फुटल्याचं आकडेवारीवरून सांगितलं जात आहे.

  • “नाना पटोलेंची पक्षात हुकुमशाही”

सेना-राष्ट्रवादीमुळेच काँग्रेसला मतं मिळाली असून काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणावर फुटल्याचा दावा बावनकुळेंनी यावेळी केला. “३१८ मतं भाजपा आणि सहयोगी पक्षांकडे होती. २४० मतं महाविकास आघाडीकडे होती. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला १८६ मतं मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळे तेवढी तरी मत त्यांना मिळाली. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हुकुमशाही भूमिका, दोन मंत्र्यांच्या दबावाखाली पक्षाला वेठीस धरणे यामुळे काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते, मतदार अस्वस्थ होते. हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याचे हे परिणाम आहेत. यात त्यांनी आत्मचिंतन करायला हवं की आपली मतं का फुटली”, असं बावनकुळे म्हणाले.

  • “खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव”

“दोन दिवस त्यांनी घोडेबाजार केला, तरी त्यांना पक्ष एकत्र ठेवता आला नाही. हा खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव आहे. त्यांचे कार्यकर्ते इमानदारीने काम करण्यासाठी तयार होते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याच्या लायकीचे नाही. त्यांनी हतबल प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे”, असं बावनकुळे म्हणाले.

  • “..म्हणून मतदारांनी त्यांना जागा दाखवली”

“भाजपानं आपली मतं एकत्र ठेवण्यासाठी एखादा प्रयत्न केला म्हणजे तो घोडेबाजार होतो का? आमचे मतदार एकत्र असणे ही भूमिका प्रत्येक पक्षाची असते. घोडेबाजार तर दोन रात्रींमध्ये झाला, जेव्हा दोन्ही मंत्री ते करत असताना संपूर्ण नागपूरनं पाहिला आहे. पक्ष म्हणजे आपण, दुसरं कुणी नाही ही त्यांची भूमिका होती. म्हणून मतदारांनी त्यांना जागा दाखवली आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.

  • “यापुढे सर्व विजय भाजपाचेच”

“यानंतरचे सर्व विजय भाजपाचेच असणार आहेत. काँग्रेस पक्षाचा जो पराभव झाला, त्यात दोन मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन प्रदेशाध्यक्ष हतबल होतात. हतबल प्रदेशाध्यक्ष कधीही जिंकू शकत नाही, त्यांनी बाजूला व्हायला हवं आणि नवीन प्रदेशाध्यक्ष पक्षाला द्यायला हवा. काँग्रेसची खूप मतं फुटली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतदानामुळे त्यांना १८६ मिळाले. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे”, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसला दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button