breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही रस्त्यावरच होणार नमाज पठण, पोलिसांकडून वाहतूक वळवण्याचे आदेश

नगर |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील अजानचे भोंगे आणि रस्त्यावरील नमाज बंद करण्याची मागणी केली आहे. असं असलं तरी नगर शहरात रमजान ईदनिमित्त नेहमीप्रमाणे कोठला येथील ईदगाह मैदान आणि शेजारून जाणाऱ्या नगर-औरंगाबाद महामार्गावर सामुदायिक नमाज पठण होणार आहे. यासाठी पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा आदेशही जारी केला आहे.

उद्या मंगळवारी रमजान ईद साजरी (Ramzan Eid 2022) होत आहे. या दिवशी सकाळी सामुदायिक नमाज पठण होते आहे. यासाठी मुस्लिम बांधव कोठला येथील ईदगाह मैदानावर एकत्र येतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर धर्मीय नागरिकही उपस्थित असतात. मैदानावरील जागा अपुरी पडत असल्याने शेजारून जाणाऱ्या महामार्गाचाही वापर केला जातो. त्यासाठी या महामार्गावरील वाहतूक तात्पुरती अन्य मार्गाने वळविण्यात येते. यावर्षीही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा आदेश काढला आहे. ईदच्या दिवशी सकाळी कोठला येथील ईदगाह मैदान आणि हायवे रोड या ठिकाणी मुस्लीम बांधवांच्या नमाज पठणास अडथळा निर्माण होऊ नये, वाहनांचा कर्कश आवाजाचा व्यत्यय येवू नये तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद आणि मनमाडकडून येणारी वाहतूक पोलीस अधीक्षक चौकातून भिगांरमार्गे चांदणी चौकाकडे वळविण्यात आली आहे. तर पुणे, सोलापूरकडून येणारे वाहने चांदणी चौक, बेलेश्वर चौक, किल्ला चौक या मार्गे एसपी ऑफिस चौकाकडे वळविण्यात आली आहेत. सर्व अवजड वाहने बायपास रोडने वळविण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी ईदगाह मैदानावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी दरवर्षीप्रमाणेच ठरलेल्या ठिकाणी नमाज पठण होणार आहे. करोनाचा नियम शिथिल झाल्यानंतर प्रथमच रमजान ईदला सामुदायिक नमाज पठण होत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी नेहमीपेक्षा जास्त सतर्कता बाळगली असल्याचे दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button