ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या 123 शाळांमध्ये “म्युनिसीपल ई- क्लास रुम प्रोजेक्ट”

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या “म्युनिसीपल ई- क्लास रुम प्रोजेक्ट” पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व 123 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. दोन टप्प्यात अंमलबजावणी करण्यात आलेल्या या प्रकल्पाद्वारे महापालिकेच्या शाळेतील 117 मुख्याध्यापकांसह बाराशेहून अधिक महापालिका शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी “ई- क्लास रुम” प्रोजेक्ट महत्वाचा ठरणार आहे.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण मिळावे, त्यांची शिकण्याची क्षमता वाढावी, मनपा शाळांमध्ये ई-क्लासरूम आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उद्देशाने “ई- क्लास रुम” प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. प्रथमदर्शी 11 शाळांमध्ये हा प्रकल्प (पहिला टप्पा) हाती घेण्यात आला होता. त्यानंतर, उर्वरित 112 प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलद्वारे शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पॅन-सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने “ई- क्लास रुम” प्रोजेक्टची निवड केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत 1 हजार क्लासेसमध्ये एलईडी डिस्प्ले, कम्पुटर कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत. तसेच 1200 हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याचा फायदा सुमारे 44 हजार प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत शाळा अध्यापन-अध्ययन संसाधने, तंत्रज्ञान पायाभूत सुविधा, प्रशासकीय सहाय्य, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि शिक्षक, शाळा व्यवस्थापनासाठी संबंधित क्षमता निर्माण करणे आदी बाबींचा समावेश आहे. तसेच प्रकल्पामध्ये संगणक कक्ष, डिजीटल ई-लर्निग प्लॅटफॉर्म, वायफाय एक्सेस पॉईंट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरा, व्हीडीओ रेकॉर्डींग, शैक्षणिक विश्लेषण सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब (विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित), गणित, इंग्रजी आणि विज्ञानासाठी तज्ञ शिक्षकांची नियुक्ती, प्रकल्प व्यवस्थापन आणि हेल्प डेस्क सेवा, ऑनलाइन डॅशबोर्ड आदी बहुतांश घटकांची अंमलबजावणी पूर्णत्वास आलेली आहे.

अत्याधुनिक शिक्षण पध्दतीमुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना प्रकल्प-आधारित शिक्षण, रचनावादी दृष्टीकोनातील व्यावहारिक प्रात्यक्षिके, विद्यमान कौशल्य तसेच त्यांची बौध्दीक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मनपा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी मार्फत शाळांमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर भर देणे आवश्यक आहे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button