ताज्या घडामोडीमुंबई

राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार

आयएमडीकडून महाराष्ट्रातील या भागांना रेड अलर्ट

मुंबई : यंदा मान्सून वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल झाला, तब्बल 12 दिवस आधी मान्सूनं राज्यात एन्ट्री केली. साधारणपणे 7 जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होत असतो. मात्र यावर्षी 25 मे रोजीच मान्सूननं राज्यात प्रवेश केला. सुरुवातीला काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसानं काहीशी उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा पावसानं दमदार पुनरागमन केलं आहे. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

काय आहे हवामान विभागाचा इशारा?

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, पुढील 24 तासांंमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा –  शिवसैनिकांचा रुद्रावतार.! उद्धवसेनेकडून स्मार्ट मीटरला विरोध

पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून, या पर्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं सानप यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता पेरणी करण्यास हरकत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. परिणामी आता अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचलं आहे. सब वे बंद असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. अंधेरी सब वे बंद झाल्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल सुरू आहेत. मुंबईच्या पवई परिसरात देखील सकाळपासून पाऊस सुरू आहे, सकाळी रिमझिम सुरू असलेला पावसाचा आता जोर वाढला आहे.

कल्याण, डोबिवलीला पावसानं झोडपलं

दुसरीकडे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. त्यामुळे शहराच्या सखल भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इतर सकल भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही या आधीच्या पावसात देखील कल्याण डोंबिवली महापालिकेने केलेल्या नालेसफाईचे पोलखोल झाली आहे.

करुळ घाटात दरड कोसळली

सतत सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल पाच तासानंतर पुन्हा एकदा करुळ घाटातून वाहतूक सुरू झाली आहे. रस्त्यातून मातीचा ढिगारा हटवण्यात आला आहे.

वीज कोसळून तीघांचा मृत्यू

दरम्यान दुसरीकडे जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे वीज पडून एकाच कुटुंबातील 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. शेतात पेरणी करत असताना वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी हे कुटुंब एका झाडाखाली थांबलं होतं. त्याचवेळी झाडावर वीज कोसळून हा अपघात झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button