महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीचे सत्र सुरुच आहे. खा. संभाजीराजे, विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आज कॉँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीतील महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याची माहिती थोरात यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या भेटीचे फोटो ट्विट करण्यात आले. तर बाळासाहेब थोरात यांनीही भेटीचा फोटो ट्विट करत शरद पवारांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. या भेटीत शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीतील महामंडळ वाटपावर चर्चा झाली. तसेच इतर अनेक राजकीय विषयांवरही चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबतही चर्चा झाली असून या विषयासंदर्भात आम्ही गंभीर आहोत. येत्या 5 जुलैपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडणुक घेण्याची आमची भुमिका आहे. त्यावरही भेटीत चर्चा झाली असल्याचे थोरातांनी स्पष्ट केले.





