रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल, मांस मटण विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल करू नये, असे शासनाचे आदेश

डोंबिवली : रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल करण्यास प्रतिबंध करणारा आदेश काढला होता. तरीही या आदेशाचे उल्लंघन करून रामनवमीच्या दिवशी डोंबिवली परिसरातील लोढा हेवन, मलंग गड रस्त्यावरील काका ढाबा भागात मांस विक्री करणाऱ्या एकूण पाच जणांच्या विरुध्द पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
महादेव लोखंडे, ताज अली शेख, शाबान अहमद, रमजान अहमद, साजन जुहाद शेख अशी गुन्हा दाखल मटण विक्री दुकानदारांची नावे आहेत. हवालदार रवींद्र जाधव यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारीनुसार, रविवारी रामनवमी निमित्त पोलीस पथक मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. शासन आदेश आणि पालिका सूचनेप्रमाणे रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल करून मटण विक्री करण्यास प्रतिबंध आहे. तशाच सूचना कल्याण डोंबिव पालिकेने पालिका हद्दीतील मटण विक्री दुकानदारांना दिल्या होत्या. तरीही रामनवमीच्या दिवशी गस्त घालत असताना लोढा हेवन भागातील वैष्णवी ट्रेडर्स दुकानात मांस विक्री सुरू असल्याचे आढळले. महादेव लोखंडे हे दुकान मालक, ताज अली शेख हे दुकान चालवित होते.
हेही वाचा – ‘इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप’मध्ये पीसीसीओई अव्वल
या दुकानाच्या पुढील भागात लोढा हेवन शिवाजी चौक भागातील रमजान चिकन सेंटरमध्ये मांस विक्री सुरू होती. शाबान निसार शेख हे दुकान चालवित होते. रमजान अहमद यांच्या मालकीचे हे दुकान आहे. पोलिसांनी पंचांन बोलावून ही दोन्ही मटण विक्रीची दुकाने शासन, पालिकेचा आदेश झुगारून सुरू असल्याचा पंचनामा केला.
कल्याण पूर्वेतील मलंगगड भागातील काका ढाब्याच्या बाजुला जनता चिकन शॉपमध्ये दुन मालक साजन शेख हे मटण विक्री करताना पोलिसांना आढळले. रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल करू नये. मांस विक्री करू नये असे शासनाचे आदेश आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका हद्दीतील सर्व मटण, मांस विक्री दुकानदारांना याबाबत कळवुनही या पाचही मटण विक्रेत्यांनी रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल केली आणि मटण विक्रीची दुकाने उघडी ठेऊन मांस विक्री केली म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या 334, 336 आणि 376 अ अन्वये पोलिसांनी पाचही मटण विक्री दुकानदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.