WTC फायनल पाऊस किंवा ड्रॉमुळे सामना अनिर्णित राहिल्यास काय होईल? जाणून घ्या ICC चे नियम

WTC Final | लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ११ ते १५ जून दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) अंतिम सामना रंगणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना अत्यंत उत्साहवर्धक असणार आहे, कारण गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि प्रथमच फायनलमध्ये पोहोचलेला दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा लढा चुरशीचा असेल. पण जर पाऊस किंवा इतर कारणांमुळे हा सामना बरोबरीत (टाय) सुटला किंवा अनिर्णित (ड्रॉ) राहिला, तर विजेता कोण ठरणार? याबाबत आयसीसीचे नियम काय सांगतात, चला जाणून घेऊया.
ड्रॉ किंवा टाय झाल्यास काय होईल?
आयसीसीच्या नियमानुसार, जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या चक्रातील अंतिम सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही किंवा अनिर्णित राहिला तर बक्षीस रक्कम समान प्रमाणात दोन्ही संघांमध्ये विभागली जाईल.
हेही वाचा : महाराष्ट्रात दारू महागणार! नवे मद्यधोरण जाहीर, उत्पादन शुल्कात वाढ
राखीव दिवसाची तरतूद
पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ नये यासाठी आयसीसीने या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस (Reserve Day) ठेवला आहे, जो १६ जून रोजी आहे. हा राखीव दिवस फक्त तेव्हाच वापरला जाईल, जेव्हा पाच नियोजित दिवसांमध्ये खेळाच्या वेळेचा अपुरा भाग पूर्ण होऊ शकणार नाही. कसोटी सामन्यासाठी एकूण ३० तासांचा खेळ (दररोज ६ तास) निश्चित केलेला आहे. जर पावसामुळे एखाद्या दिवशी खेळ पूर्णपणे धुतला गेला आणि तो वेळ इतर दिवशी भरून काढला गेला नाही, तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल. उदाहरणार्थ, जर एका दिवसाचा खेळ पूर्णपणे रद्द झाला आणि उर्वरित चार दिवसांत फक्त तीन तासांचा खेळ भरून काढला गेला, तर राखीव दिवसात उर्वरित वेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.