“माझा शंभू” गाण्याच्या माध्यमातून संभाजी महाराजांबद्दल जागृती
'छावा' चित्रपटाची प्रेरणा - E2M बँडची संकल्पना

मुंबई : “छावा” चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लहानग्यांच्या मनात एकच प्रश्न उमटला – आम्हाला शिवाजी महाराज शिकवले, पण संभाजी महाराजांबद्दल का सांगितले जात नाही? या प्रश्नाने प्रेरित होऊन E2M बँडने “माझा शंभू” हे गाणे नुकतेच साकारले आहे. या गाण्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच शिकवणे महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले आहे.
हे गाणे गीतकार सई आणि दिपिका पाटे यांनी लिहिले असून, यात इंफ्लुएन्सर पोस्टर बॉय चेतन यांनी शिक्षकाची भूमिका साकारली आहे. तसेच बोरिवली पूर्व अभिनव विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेत उत्तम काम केले आहे. “माझा शंभू” या गाण्यातून एक महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे, संभाजी महाराज हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते, तर एक उत्तम योद्धा, कुशल प्रशासक आणि बलिदान देणारे धर्माभिमानी राजे होते. त्यांच्या पराक्रमामुळेच मराठा साम्राज्य पुढे टिकून राहिले. मात्र, अनेक शालेय अभ्यासक्रमांमध्ये त्यांच्या योगदानाला योग्य स्थान दिले जात नाही.
हेही वाचा : गोरगरिब रुग्णांच्या अर्थसहाय्यासाठी आमदार लांडगे सरसावले!
इतिहास शिक्षणातील गंभीर पोकळी
आज लाखो रुपये खर्चून पालक आपल्या मुलांचे शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, अनेक शाळांमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत इतिहास विषय शिकवलाच जात नाही. पुढे जाऊन शिकवला गेला तरी, मराठ्यांच्या शौर्यापेक्षा मुघलांच्या इतिहासाला अधिक प्राधान्य दिले जाते. अशी तक्रार अनेक पालक करतात. यामुळेच लहान मुलांच्या मनात अनेकदा संभाजी महाराजांबद्दल अज्ञान राहते. “छावा” चित्रपट पाहिल्यानंतर अनेक मुलांना व पालकांना या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यामुळेच “माझा शंभू” या गाण्यातून शिक्षणव्यवस्थेकडे एका मोठ्या प्रश्नाची दखल घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर “माझा शंभू” या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती दिली जात असून सर्व निर्माते, कलाकार व सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.