मुंबईकरांनो, तीन दिवस पावसाचे; हवामान विभागाचा इशारा
![Rain in winter… and now the danger of hurricanes too!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/rain-drops-umbrella-raining-storm-weather-generic.jpg)
मुंबई – शनिवारपासून धो धो कोसळणाऱ्या मुंबईच्या पावसाने काहीशी उसंत घेतली होती, मात्र आज पहाटेपासून पुन्हा जोर धरला. पावसाचा हा जोर पुढील तीन दिवस कायम राहणार असून हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील ३ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मुंबईत मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत राम मंदिर येथे ७८ मिमी असा २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.१ आणि किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.