मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट

मुंबई – मागील 6 वर्षापासून पेटलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा आरक्षण कायदा देखील रद्द केला आहे. त्यामुळे आता मराठा समाजात नाराजी आहे. राज्यसरकार यावर पुढील पाऊल उचलत राष्ट्रपतींकडून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यासोबत राज्यपालांची भेट घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि समितीचे इतर सदस्य आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांना भेटून राज्य सरकारतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता राजभवनावर ही भेट होणार आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारचा नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांच्याकडे हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानांनी 370 कलम रद्द करताना जी संवेदनशीलता दाखवली तशीच संवेदनशीलतेची आता गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानं राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असं राजकारण रंगलं आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला होता. त्यावर ठाकरे सरकारच्या मंत्र्याकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या.





