ताज्या घडामोडीमुंबई

छत्रपती संभाजीनगर एन-८ परिसरातील आझाद चौकात फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग

तीन तासांनंतर आग आटोक्यात, भीषण आगीत १८ दुकाने जळून खाक

छत्रपती संभाजीनगर : येथील एन-८ परिसरातील आझाद चौकात फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. २०) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आली. यात फर्निचरची १८ दुकाने आणि पत्र्याचे शेड भस्मसात झाले. यात जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले.

धुराच्या लोटांसह क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी रौद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांची मदत, अग्निशमन दलाचे प्रयत्न आणि महापालिका, पोलिस यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. प्रत्यक्षदर्शी वाजेद जहागीरदार म्हणाले, ‘‘सकाळी सहरी करून बसलो होतो. नमाजची वेळ असल्याने सर्वच मशिदींमध्ये होतो.

नमाजहून आल्यावर फर्निचर मार्केटमधील एका दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. अग्निशमन दलाला फोन केला. सहाच्या सुमारास अग्निशमन बंब आला. तोपर्यंत आग भडकली होती. पाच ते सात दुकानांपर्यंत आग पोचली होती. त्यानंतर गरवारे कंपनीसह इतर ठिकाणांहूनही बंब दाखल झाले. सगळीकडे धूरच धूर झाल्याने महापालिकेच्या तीन जेसीबी घटनास्थळी आल्या. त्यांनी मलबा हटवत आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठी भूमिका निभावली. पहाटे साडेपाचच्या सुमारास भडकलेली आग सकाळी साडेआठच्या सुमारास आटोक्यात आली. त्यानंतर दिवसभर मलबा हटवण्याचे काम सुरू होते.’’

हेही वाचा –  बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुले होण्यासाठी आणखी प्रतीक्षा

शेजारच्या घराला झळ
अय्युब जहागीरदार यांच्या घराच्या भिंतीलगत ही सर्व दुकाने आहेत. या आगीची झळ भिंतीला लागून असेल्या घराला बसली. त्यात चार एसी, पाणी, ड्रेनेजची पाइपलाइन, वायरिंग, मीटर खाक झाले. शिवाय बेडरूमलाही आगीने घेरले होते. तातडीने कुटुंबीयांनी ही आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

तीसहून अधिक टॅंकर, ९ बंब
तीसहून अधिक टॅंकर आणि नऊ केंद्रांचे बंद आग आटोक्यात आणण्यासाठी लागले. उपअग्निशमन अधिकारी खांडेकर म्हणाले, ‘‘ कारण अद्याप स्पष्ट नाही.’’ प्रत्यक्षदर्शी म्हणाले, ‘‘आधी डीपीजवळ नंतर फर्निचर दुकानात आग लागली.’’

यांची दुकाने जळाली
इम्तियाज अहेमद (रॉयल स्टील), अय्युब खान (अलमास फर्निचर), कलिम शेख (औरंगाबाद फर्निचर), अजमल खान (अरमान फर्निचर), सय्यद अल्ताफ (शोएब फर्निचर), शेख सिराज (दानिश फर्निचर), अफसर पठाण (मोहीत फर्निचर), अनवर शेख (अन्नु फर्निचर), सरदार भाई (ए.के. फर्निचर), वारीस देशमुख (देशमुख फर्निचर), राजीक शेख (अफान फर्निचर), सय्यक शकिर (तवक्कल फर्निचर), सलमान खान (रेहान फर्निचर), वसीम खान (राज फर्निचर), सय्यद मजीद (रॉयल फर्निचर), मुनवर खान (सागर ट्रेडिंग कं), इस्माईल शाह (भारत वॉशिंग) आदी १८ दुकाने खाक झाली. यासह ३ घरांचे आणि पत्र्यांच्या शेडेचे नुकसान झाले. हे नुकसान लाखात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इतरही स्टेशनहून बंब बोलावले
मुस्ताक तडवी (अग्निशमन दल) ः अग्निशमन दलाला सकाळी ५.३८ ला कॉल येताच सिडकोच्या एन-९ येथील अग्निशमन केंद्रातून पहिल्या वाहनात मी अग्निशमन बंबासोबत पोचलो. उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड, अशोक खांडेकर हेही घटनास्थळी पोचले. आगीचे स्वरूप लक्षात घेत त्यांनी पदमपुरा, सिडको, एमआयडीसी, गरवारे कंपनीच्या अग्निशमन केंद्रातील अग्निशमन बंबांना बोलावले. तोपर्यंत सव्वासहा झाले होते. आगीने रौद्ररूप धारण केले होते. तोच अग्निशमन बंब रिकामे झाले.

पाण्याच्या टॅंकरची केली व्यवस्था
विजय राठोड (उपअग्निशमन अधिकारी) ः पहिला बंब रिकामा झाल्यावर पाण्याच्या व्यवस्थेसाठी मी कॅनाट जवळील पाण्याच्या टाकीवर पोचलो. तेथून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था केली. साडेसहापर्यंत टॅंकर पोचले. मात्र, याच दरम्यान आगीने जवळपास पंधरा दुकानांना भस्मसात केले. पाण्याच्या नियोजनादरम्यान आग वाढली. नागरिकांनीही टॅंकर, पाण्याची व्यवस्था करण्यास मदत करून आगीवर नियंत्रण मिळवण्यास जवानांना मदत केली.

क्षणार्धात आग भडकली
अनिल शिंदे (किराणा दुकादार) ः पहाटे साडेपाचच्या सुमारास दुधाची गाडी आल्याने दूध घेण्यासाठी मी आझाद चौकात आलो. त्यावेळी नुकतीच आग लागलेली होती. काही लोक आगीवर पाणी मारून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होते. दुकानातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिस्थिती गंभीर झाली.

पाण्याचा बॅकअप सोबत हवा होता
शेख एजाज (स्थानिक रहिवासी) ः सकाळी सहाला नमाजवरून आलो तर आझाद चौकात आग आणि धूरच धूर होता. परिसरातील लोक आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. तोच अग्निशमन बंब आला. पण, तो लगेच संपला. त्याला बॅकअप नव्हते. दुसरा बंब उशिरा आला. पहिल्याच कॉलमध्ये सर्व बंब एकत्रित येऊन प्रयत्न झाले असते तर कमी दुकानांना झळ पोचली असती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button