Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुले होण्यासाठी आणखी प्रतीक्षा

पिंपरी : चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी नऊ वर्षांपासून बंद असून, आतापर्यंत २० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात आल्याने आणखी सव्वा वर्ष हे संग्रहालय खुले होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पशु-पक्ष्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये ‘एमआयडीसी’च्या सात एकर जागेत १९८९ मध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारले. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे २०१६ ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयाला टाळे आहे. प्राणी संग्रहालयासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सर्पोद्यान व प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. संग्रहालयावर आतापर्यंत दाेन टप्प्यांत २० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. नऊ वर्षे हाेऊनही प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले नसून संग्रहालयास टाळे आहे.

या कामात गैरव्यवहार झाल्याचा आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ३६ प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे (एफडीसीएम) हस्तांतरित करण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला.

हेही वाचा –  संत मदर तेरेसा पुलावर उभारला आणखी एक रॅम्‍प

महामंडळाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या प्राणिसंग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून ते पूर्ण करावे, पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, त्याप्रमाणे सेवा-सुविधा निर्माण करावी, अशा सूचना केल्या. त्यामुळे महापालिकेने जुनी निविदा रद्द केली. संग्रहालयासाठी एक तज्ज्ञ अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. त्यानंतर सल्लागार बदलण्यात आला. आराखड्यात बदल आणि सुधारणा करून फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये पात्र ठरलेल्या ठेकेदाराला तिसऱ्या टप्प्यातील काम देण्यात आले आहे. यासाठी २४ काेटी दोन लाख १६ हजार ६८ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या खर्चाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार आणि प्राणीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संग्रहालयाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील संग्रहालयाचे काम १५ महिन्यांत पूर्ण हाेणे अपेक्षित आहे. ताेपर्यंत संग्रहालय बंदच राहणार असल्याचे स्थापत्य उद्यान विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही नऊ वर्षांपासून प्राणी संग्रहालय बंद आहे. त्यामुळे मुलांना प्राणी, पक्ष्यांची माहिती मिळत नाही. हे काम संथ गतीने सुरू असून, कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, असे काशिनाथ नखाते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button