TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पोलीस भरतीच्या निकषांमध्ये बदल? ; सर्व समाजघटकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न

मुंबई : करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील अधिकाधिक तरुणांचा समावेश करण्याच्या उद्देशाने तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भरतीच्या अटी आणि शर्तीमध्ये बदल केला जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. तरुणांनी यावरून समाजमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. २०२१ मधील पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याच्या सूचना महासंचालक कार्यालयातील प्रशिक्षण व खास पथके या विभागामार्फत देण्यात आली. तसेच ही जाहिरात देण्याबाबतचे यथावकाश कळविण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व पोलीस विभागांना देण्यात आल्या होत्या. भरतीबाबतची ही जाहिरात १ नोव्हेंबरला काढण्यात येणार होती. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती.

जवळपास १४ हजार ९५६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र करोनाकाळात भरती होऊ न शकल्याने वय उलटलेल्या उमेदवारांना संधी मिळावी, हा पोलीसभरतीमागील स्थगितीचा सरकारचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. तसचे जातनिहाय भरतीबाबत फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील अधिकाधिक तरुणांना या भरतीत सहभाग घेता यावे, या उद्देशाने अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे समाजमाध्यमांवर मात्र तरुणांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली असताना आता नव्या १४ हजार ९५६ पदांच्या भरतीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button