सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वकष अभ्यासक्रम
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मागणीवर आधारित

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि त्यांचा एकूणच इतिहास हा देशातील प्रत्येक तरुणांना प्रेरणादायी असा आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यांच्या माहितीसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) तसेच आयसीएसई आणि केंब्रीज आदी मंडळांच्या अभ्यासक्रमात त्यांचा सर्वंकष अभ्यासक्रम असावा अशी मागणी अखलि भारतीय मराठा महासंघाकडून लावून धरण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वाभिमानाची शिकवण, तीनही दलालंमध्ये युद्धकौशल्य, सैन्य दलांचे नियोजन, गडकिल्यांची निर्मिती, स्थापत्यकला, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, हिंदू मंदिरांचे संरक्षण आणि गनिमी काव्याचे महत्त्व , धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे महत्त्व आदी अनेक विषय देशातील प्रत्येक पहिलीच्या वर्गापासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चांगला नागरीक घडविण्यापासून ते त्यांच्या विविध विषयांचे कौशल्य, ज्ञान आदी विकसित करण्यासाठी महत्वाचे आहेत.
हेही वाचा : ‘सुरेश धस, धनंजय मुंडे आणि कराड एकच’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
त्यांची ओळख आणि त्यासाठीचा अभ्यासक्रम हा देशातील सर्वात मोठ्या शिक्षण मंडळ असलेल्या सीबीएसईमध्ये आवश्यक असल्याने यासाठी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी करत त्यांची भेट घेऊन यासाठीचे निवेदन नुकतेच दिले असल्याची त्यांनी सांगितले.
दहातोंडे यांनी दिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे आणि योगदाचे महत्त्व विषद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेने न्याय, समता आणि राष्ट्रभक्तीचे मूलतत्त्व रुजवले. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समावेशक प्रशासन आजही आपल्याला दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन विद्यार्थ्यांना नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि विविधतेचा आदर करण्याचे गुण शिकवते. त्यामुळे त्यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते सीबीएसई, आयसीएसई आदी केंद्रीय मंडळाच्या सर्व अभ्यासक्रमांत शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यांची सर्वंकष अशी माहिती देणारा अभ्यासक्रम असावा अशी आपली मागणी असून त्यासाठीची अंमलबजावणी केली जावी अशी महासंघाची मागणी असल्याचेही दहातोंडे यांनी सांगितले.