आषाढी एकादशीलाही राज्यात आषाढधारा कोसळणार
मुसळधार पावसाचा दोन दिवस अंदाज, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आषाढी एकादशीलाही राज्यात आषाढधारा कोसळणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आणि उत्तर कोकणातील तुरळक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. काही जिल्ह्यामध्ये सोसाट्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज आणि उद्या अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. यामुळे घाट परिसराला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.
हेही वाचा – ‘गुरु हेच जीवनाचे दीपस्तंभ’; उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबईत पावसाचा जोर कायम
रविवारी मुंबईत सकाळपासून पाऊस सुरु आहे. मुंबई आणि उपनगरात तसेच वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे नालासोपारा पूर्व आचोळा रोड, नागीनदास पाडा, आचोळा पोलीस स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावरील सखल भागात पाणी साचले होते.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवस या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी रात्री विदर्भातील चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात विदर्भात सरासरी पेक्षा कमी झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोर पकडला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीत पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणांसह नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फूट एक इंचांवर आहे. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली आहेत.