एअरटेलच्या कर्मचाऱ्याकडून मराठीत बोलण्यास नकार
महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. त्यातच आता मनसेसह शिवसेनेनेही एअरटेलच्या एका कार्यालयाला मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. एक मराठी तरुण एअरटेलच्या गॅलरीत तक्रार घेऊन गेला होता. मात्र यावेळी एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला. यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी एअरटेलच्या मालाड कार्यालयाला थेट धमकी दिली आहे. जर तुम्ही तुमच्या मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्हीही तुमचा आदर करणार नाही, अशी उघड धमकी अखिल चित्रे यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील चारकोप परिसरात असलेल्या एअरटेलच्या कंपनीत मराठी भाषेवरून एक तरुण आणि महिला कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या महिलेला मराठी भाषा येत नसल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी नुकतंच एअरटेल कंपनीच्या चारकोप कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते आक्रमक झाले. कांदिवलीतील चारकोप येथील एअरटेल गॅलरीत मराठी न बोलल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील माटे शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
एअरटेलच्या गॅलरीत तक्रार घेऊन गेलेल्या एका मराठी माणसाला एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर मराठी भाषेवरून मराठी तरुण आणि एअरटेल महिला कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या दोघांचाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठी न बोलल्याबद्दल मनसे कार्यकर्ते चारकोपमधील एअरटेल गॅलरीत गेले. ते तिथे धरणे आंदोलनाला बसले होते. मनसेच्या निषेधानंतर एअरटेल कर्मचाऱ्यांनी माफी मागितली. महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे.
अखिल चित्रेंची धमकी
या प्रकरणानंतर शिवसेना नेते अखिल चित्रे मराठीचा मुद्दा घेऊन मालाड एअरटेल कार्यालयात पोहोचले होते. एअरटेल हवेत आहे. मी ते हवेतून खाली खेचण्यासाठी आलो आहे, असे अखिल चित्रे यांनी सांगितले. एअरटेल कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर ते हिंदीसाठी एक, मराठीसाठी दोन आणि इंग्रजीसाठी तीन असे बटण दाबा सांगतात. पण कोणतेही बटण दाबले तरी ते फक्त हिंदीतच बोलतात. एअरटेलच्या कोणत्याही गॅलरीमध्ये एकही मराठी भाषिक कर्मचारी नाही आणि आम्ही अशी मागणी केली आहे की मराठी भाषिकांना कामावर ठेवावे. मराठी भाषिकांना गॅलरीत ठेवावे. जर तुम्ही तुमच्या मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्हीही तुमचा आदर करणार नाही, अशी उघड धमकी अखिल चित्रे यांनी दिली.