अमोल थोरात यांच्या विधान परिषद उमेदवारीला भाजप कार्यकर्त्याचाच विरोध
पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले पत्र

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रातून पक्षाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी विधान परिषदेसाठी अमोल थोरात यांच्या संभाव्य उमेदवारीला जोरदार विरोध दर्शवला आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, चिंचवड विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल थोरात यांनी “घराणेशाही”चा मुद्दा उपस्थित करत माजी आमदार अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात पक्षविरोधी भूमिका घेतली होती. तसेच, त्यांनी पक्षाच्या तब्बल १५ नगरसेवकांना दुसऱ्या पक्षात जाण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील माटे शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
अशा पार्श्वभूमीवर, अमोल थोरात हे आता भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थक असल्याचे भासवून विधान परिषदेत उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पत्रात म्हटले आहे. मात्र, पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या व्यक्तींना संधी देणे योग्य ठरणार नाही, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी द्यावी आणि केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा मुलगा असल्यामुळे अमोल थोरात यांना विधान परिषदेत संधी देऊ नये, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच, यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी थोरात यांना महामंडळाच्या सदस्यपदी संधी दिली होती, त्यावेळीही त्यांचा पक्षांतर्गत तीव्र विरोध झाला होता, असेही पत्रात नमूद आहे. या पत्रामुळे अमोल थोरात यांच्या संभाव्य उमेदवारीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. आता पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणी काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.